व्हेल माशाच्या उलटी प्रकरणी संशयितांची नोटीसा देत सुटका…

2

तपासाच्या वेळी ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना ; मालवण पोलिसांकडून तपास सुरू…

मालवण, ता.१७ : वेरळ येथे व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी नेताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडलेल्या नऊ संशयितांना नोटिसा बजावून सोडण्यात आले. मात्र चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी सांगितले.

गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने काल दुपारी मसुरे-वेरळ माळरानावर सापळा रचून व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या तुषार चंद्रकांत घाडी (वय- ३२) रा. भरणी घाडीवाडी ता. कणकवली, बजरंग आत्माराम कदम (वय- ५४) रा. ओझर्डे इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली, सतीश शांताराम मोरे (वय-५४) भाईंदर ईस्ट ठाणे, अजित नारायण घाडीगावकर (वय- ४६) रा. कळसुली गांगोसखलवाडी ता. कणकवली, अनिकेत प्रकाश चव्हाण (वय- ३२) रा. मसुरे गडघेरावाडी ता. मालवण, शशांक प्रकाश चव्हाण (वय- ३४) रा. तळेरे बाजार ता. कणकवली, हेमंत अशोक मेथर (वय ४९) रा. कोळंब ता. मालवण, पांडुरंग चंद्रकांत राणे (वय- ३८) रा. मसुरे कावावाडी ता. मालवण, प्रवीण चंद्रकांत भोई (वय- ३५) रा. कुडाळ भोयाचे केरवडे ता. कुडाळ या नऊ संशयितांना पकडले. त्याच्याकडून २४ किलो २६४ ग्रॅम वजनाची आणि सुमारे २५ कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थाचे तुकडे जप्त करण्यात आले. दोन चारचाकी गाड्यांसह एक दुचाकीही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती.

संशयित नऊ जणांवर वन्यजीव सरंक्षक अधिनियम १९७२ कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. संबधितांना पोलिसांनी नोटिसा बजावत सोडून देताना तपासाच्या वेळी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संशयितांकडून जप्त करण्यात आलेली व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थांचे तुकडे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

368

4