२१ कोटी ३९ लाख खर्चाचा सुधारित अर्थसंकल्प सादर
सिंधुदुर्गनगरी, ता.३१ : या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेचा १६ कोटि ४५ लाख ४३ हजार ५०० रूपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात ५ कोटी रूपये खर्चाची वाढ करून बुधवारी झालेल्या वित्त समिती सभेत सुधारित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सभापती जेरॉन फर्नांडिस यांनी आपल्या मतदार संघातील आचरा ग्राम पंचायत सभागृहात वित्त व बांधकाम या दोन्ही समित्यांच्या मासिक सभा संपन्न झाल्या.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, प्रभारी कार्यकारी अभियंता पी एस पाटील, सदस्य संतोष साटविलकर, रविंद्र जठार, रेश्मा सावंत, अनघा राणे, महेंद्र चव्हाण, श्रिया सावंत, राजन मुळीक, मनस्वी घारे, संजय देसाई आदी सदस्यांसह पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, आचरा माजी सरपंच अनिल करंजे, ग्रा. पं. सदस्य रेश्मा कांबळे, दिव्या आचरेकर, योगेश गांवकर, अनुष्का गांवकर, लवू घाडी, वैशाली कदम, वृषाली आचरेकर, ममता मिराशी आदी उपस्थित होते. यावेळी स्थायी समितिला शिफारस करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या सुधारित अर्थसंकल्पात बदल करण्याचे अधिकार सभापती फर्नांडिस यांना देण्यात आले.
यावेळी शिरवंडे लाडवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर नैसर्गिक आपत्तीत कोसळली. १९९९ मध्ये ही विहीर बांधण्यात आलेली होती. तेथील ग्रामस्थांना या विहिरीचे पाणी गरजेचे असून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ प्रयत्न करावेत, अशी मागणी महेंद्र चव्हाण यांनी केली. राज्य पशु संवर्धन विभागाचे उपायुक्त व्यवस्थित माहिती देत नसल्याची तक्रार संतोष साटविलकर यांनी केली.
‘त्या’ ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार
कणकवली तालुक्यातील नडगीवे येथील शाळेचे काम अर्धवट असून विहित मुदतीत पूर्ण झालेले नाही. यापूर्वी बांधकाम विभागाने १५ जुलैला हे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने रविंद्र जठार यांनी काम कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न केला. त्यावेळी १५ ऑगस्टला तळमजल्याचे काम पूर्ण होईल, असे बांधकाम विभागाने सांगितले. तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामही अर्धवट राहिले आहे. ही दोन्ही काम एकाच ठेकेदाराने घेतली आहेत. अशा ठेकेदारला तुम्ही पाठीशी का घालता ?असा प्रश्न जठार यांनी केला. यावेळी सदर ठेकेदाराकडे किती काम विहित मुदतीत पूर्ण झालेली नाहीत, याची माहिती घेवून त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.
सामान्य प्रशासन विभागाला कारणे दाखवा नोटिस
दादासाहेब धर्माधिकारी यांना जिल्हा परिषदेने पुरस्कार जाहिर करून दोन वर्षे उलटली. त्यासाठी तरतूद आता करण्यात येत आहे. त्यामुळे हा पुरस्कार देण्यात येणार की नाही ? असा प्रश्न रविंद्र जठार यांनी केला. त्यावेळी जगदाळे यांनी हा विषय सामान्य प्रशासन विभागाचा आहे, असे सांगितले. त्यावेळी प्रशासनाने सामान्य प्रशासन विभागाला नोटीस पाठवून खुलासा मागण्याची सूचना केली.