प्रशासनाची माहिती; ४४ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी ९ जण कामावर हजर…
वेंगुर्ले,ता.१८: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन सुरूच असताना वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये मात्र संपात फूट पडली आहे. ९ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत,अशी माहिती प्रशासनाकडून आज देण्यात आली. तर उर्वरित कर्मचारी अद्यापपर्यंत संपात सहभागी आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज पाचव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात सर्वच कर्मचारी तसेच शिक्षक सहभागी झाले होते. यातील प्राथमिक शिक्षण संघाने मात्र या संपातून बाहेर पडण्याचा निर्णय पहिल्या दिवशी घेतला होता. त्या नंतर कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेचे १३ अधिकारी कर्मचारी आणि ३१ सफाई कर्मचारी असे एकूण ४४ अधिकारी कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले होते. मात्र त्यातील ७ अधिकारी व कर्मचारी आणि २ सफाई कर्मचारी असे एकूण ९ कर्मचारी संपातून माघार घेऊन कामावर हजर झाले आहेत. उर्वरित अधिकारी व कर्मचारी मात्र अद्याप संपात सहभागी आहेत.