भाजपात प्रवेश देणे आहे : शिरोडा येथील बॅंनरमुळे खळबळ

2

वेंगुर्ले.ता,३१:विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये सध्या मोठया प्रमाणात प्रवेश सुरू आहेत. यावर सोशल मिडियावर टीका टिपण्णी सुरू असतानाच आज वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठेतील मुख्य नाक्यावर “भाजपा प्रवेश देणे आहे”असा बॅंनर लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर नेत्याच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असतानाच पुण्यानंतर आता शिरोडा शहरात बॅंनर
लावल्याने चर्चेचा विषय बनले आहेत. दरम्यान, हे पोस्टर विरोधकांनी लावले की या पक्ष प्रवेशाला कंटाळलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
दरम्यान लावण्यात आलेल्या या बॅंनरवर असे लिहिले आहे की,
भाजपा प्रवेश देणे आहे, त्यात दिलेल्या अटी व शर्थी मध्ये पहिली अट ईडी व आयकर विभागाची नोटीस आली असल्यास प्राधान्य, दुसरी अट भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती, तर तिसरी अट सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा असे म्हटले आहे. तसेच बॅंनरवर टीप ही देण्यात आली असून त्यात विचारधारेची कोणतेही अट नाही तसेच आमच्याकडे जागा नसल्यास मित्र शाखेत अँडजेस्ट करता येईल असे नमूद करून संपर्कासाठी टोल फ्री नं.८९८०८०८०८० असा देण्यात आला आहे.

4