जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर जिंदादिल माणूस : जिल्हाधिकारी पांढरपट्टे

247
2
Google search engine
Google search engine

पत्रकारांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी,ता.३१: प्रशासनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास मनुष्य अपयशी होत नाही याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर! त्यांच्याबद्दलची पत्रकार व सर्वसामान्यांची भावना ही आदराची असल्यानेच बांदिवडेकर जिंदादिल माणूस आहेत असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डाॅ दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमावेळी काढले.
जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर हे बुधवारी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त जिल्हयातील पत्रकारांच्या वतीने त्यांचा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या जिल्हा नियोजन सभागृहात सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डाॅ दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, समाजकल्याण उपायुक्त जयंत चाचरकर, मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, मुख्यमंत्र्यांचे माजी स्वीयसहाय्यक सतीश पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव कदम, वसंत केसरकर, नितीन तळेकर यांच्यासह जिल्हाभरातून पत्रकार, माहीती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी व पत्रकार संघाच्या वतीने माळवते जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डाॅ पांढरपट्टे म्हणाले, माझा व बांदिवडेकर यांचा परिचय प्रदीर्घ आहे. संगीत, वारकरी संप्रदाय व समाजसेवेची आवड असलेले अधिकारी मिलिंद बांदिवडेकर अजातशत्रू आहेत. कामात तत्परता व सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने ते समाधानाने निवृत्त होत आहेत. कारण शासकीय सेवेतून निवृत्त होणे म्हणजे पराक्रमाची आहे. निरोप समारंभ कार्यक्रमात एखाद्या अधिका-याला सेवेतून निलंबित होताना मी पाहिले आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ब-याच ठिकाणी माहिती अधिकारी व पत्रकार यांचे नाते विळ्या भोपळ्याचे असते. मात्र तसे भांडण अथवा इगो इथे पहायला मिळत नाही. बांदिवडेकर यांनी सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवत शासकीय योजनांची माहिती सर्वसान्यांपर्यत पोचवण्याचे काम लिलया पार पाठल्याचेही ते म्हणाले.
मावळते जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर म्हणाले, आपला स्वभाव चांगला असेल तर आपल्याला माणसेही चांगलीच भेटतात. मित्राला दोष आणि गुणांसह स्विकारले म्हणजे माणूस जिंकतो व मैत्री टिकते. मी प्रशासकीय सेवेतील 34 वर्षात प्रत्येक माणसात पांडुरंग पाहीला. निवृत्त झाल्यानंतर अंगी 80 रेड्यांचे बळ घेवून समाजसेवा, तरूणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन यासह संगीत व वारकरी संप्रदायाचे काम करणार असल्याचे बांदिवडेकर यांनी सांगितले.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे म्हणाले, आयुष्यात आनंदी जीवन कसे जगावे व विविध अडचणींवर मात करून पुढे कसे जावे हे माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांच्याकडून शिकावे. काही अधिकारी हे पत्रकारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.मात्र, बांदिवडेकर हे त्यापैकी नव्हते. त्यांनी पत्रकारांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून काम केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधवराव कदम, गजानन नाईक, वसंत केसरकर, कवी मधुसुदन नानिवडेकर, सतीश पाटणकर, संतोष वायंगणकर, भगवान लोके, रंगकर्मी उदय पंडित, नितीन तळेकर दिलीप मुळीक, मनोहर कालकुंद्रीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत मिलिंद बांदिवडेकर यांच्या स्वभावाचे पैलू उलगडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन पत्रकार बंड्या जोशी यांनी तर आभार संतोष सावंत यांनी मानले.