शिरोड्यातील प्रकार;सोशल मीडियावर रंगली चर्चा…
वेंगुर्ले ता.३१: पक्षविरोधी बॅनर लावून पक्षाची बदनामी व शिरोडा गावातील शांतता भंग करण्यात आली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी तक्रार शिरोडा येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिरोडा पोलिसांकडे केली आहे.विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशासाठी मेघाभरती सुरु असतानाच या पक्ष प्रवेशावर टीका करण्यासाठी पुण्यात भाजप प्रवेश देणे असल्याचे पोस्टर हडपसर परिसरात देण्यात आले आहेत.मात्र आता पुण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा गावामध्येही ‘भाजप प्रवेश देणे‘ असा होर्डिंग लावण्यात आली आहे.
याबाबत शिरोडा गावात जोरदार चर्चा सुरु आहे.दरम्यान, शिरोडा गावात गांधी चौकात लावलेल्या या बॅनर संबंधी पोलिस स्थानकात तक्रारीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,अज्ञाताने लावलेल्या या बॅनरमुळे भाजपा पक्षाची बदनामी झाली आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. अज्ञाताने केलेल्या या कृत्यामुळे गावातील शांतता भंग होऊ नये यासाठी बॅनर लावलेल्या जागेतील सीसीटीव्ही फुटेज चेक करावा, तसेच बॅनर लावण्याची परवानगी कुठुन घेतली याचीही चौकशी होऊन अज्ञाताच्या विरोधात कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे.
शिरोडा पोलिसांना दिलेल्या या निवेदनावर तालुका उपाध्यक्ष मनोज उगवेकर, शिरोडा शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,सदस्य सिद्धेश अणसूरकर, जयानंद शिरोडकर,महादेव शेगले, समृद्धी धानजी, साईराज गोडकर,संध्या राणे, मनोहर होडावडेकर, शंकर वारंखडकर,विद्याधर धाजनी या भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.