कणकवलीतील स्टॉलधारकांना राणेंनी वाऱ्यावर सोडले…

4
2

सतीश सावंत यांची टीका ;स्टॉल हटावनंतर राणे शांत…

कणकवली, ता.२१ : येथील स्टॉल हटाव मोहिमेमध्ये शहरातील शेकडो स्टॉलधारक, विक्रेते उध्वस्त झाले. या स्टॉलधारकांना आमदार नीतेश राणे यांनी वाऱ्यावर सोडले आहे. स्टॉल हटावनंतर त्‍यांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही अशी टीका शिवसेना जिल्‍हाप्रमुख सतीश सावंत यांनी आज केली.

येथील शिवसेना कार्यालयात श्री.सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा शिवसेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, राजू शेट्ये, प्रमोद मसुरकर आदी उपस्थित होते.

सतीश सावंत म्‍हणाले, कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्‍यानंतर विस्थापित स्टॉल धारकांच्या पूनवर्सनाची जबाबदारी आमदार नीतेश राणे यांनी दिली होती. त्‍यांच्या आश्‍वासनानंतरच स्टॉलधारक, विक्रेते यांनी विरोध बाजूला करून शहरात चौपदरीकरणाचे काम सुरू होऊ दिले होते. दरम्‍यान विस्थापित झालेल्‍या स्टॉलधारकांनाही महामार्ग विभागाकडून नुकसान भरपाई मिळवून देऊ अशी ग्‍वाही राणे यांनी दिली होती. प्रत्‍यक्षात स्टॉलधारकांना कोणतीही मदत मिळाली नाही. तर दोन दिवसापूर्वी महामार्ग विभागाने उड्डाणपुलाखालील सर्व स्टॉल हटवले. तरीही आमदार नीतेश राणे यांनी त्‍याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. सन १९९७ मध्येही महामार्ग विभागाने कणकवली शहरात स्टॉल हटाव मोहीम सुरू केली होती. त्‍यावेळी राज्‍यात मंत्री असलेल्‍या नारायण राणे यांनी स्टॉल हटाव मोहीम थांबवली होती. आता राणे केंद्रात मंत्री असतानाही ते स्टॉल हटाव मोहीम थांबवू शकलेले नाहीत.

श्री.सावंत म्‍हणाले, महामार्ग विभागाने ऐन गुढीपाडवा सणाच्या तोंडावर स्टॉल हटाव मोहीम करून स्टॉलधारकांना उध्वस्‍त केले आहे. अनेकांनी कर्ज काढून स्टॉल उभारले होते. राणे यांनी ज्‍याप्रमाणे वैभववाडीतील स्टॉलधारकांना वाऱ्यावर सोडले. त्‍याचधर्तीवर कणकवलीतील स्टॉलधारक विस्थापित झाले आहेत. या स्टॉलधारकांना गुढी पाडव्याच्या दिनी आनंदाने श्रीखंडपुरी खाण्याचा योग त्‍यांनी हिरावून घेतला आहे. भाजी मार्केट असताना अन्यत्र पूनवर्सन कशासाठी?

शहरात नगरपंचायतीचे भाजी मार्केट तयार आहे. ही इमारत नगरपंचायतीने ताब्‍यात घेतली तर शहरातील सर्व भाजी, फळ विक्रेत्‍यांचे पूनवर्सन होणे शक्‍य आहे. भाजी मार्केटची इमारत ताब्‍यात घ्या अशी मागणीही ग्‍लोबल असोसिएटचे संचालक प्रथमेश तेली यांनी केली आहे. भाजी मार्केटची इमारत तयार आहे तर तेथे विक्रेत्‍यांची व्यवस्था न करता नगरपंचायत पदाधिकारी अन्य पर्याय का शोधत आहेत. हक्‍काच्या भाजीमार्केटमध्ये त्‍यांचे स्थलांतर का करत नाहीत? असाही सवाल सतीश सावंत यांनी केला.

आमदार श्री. राणे यांनी आपल्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत रोजगार देण्याऐवजी लोकांच्या हातातून रोजगार हिरावण्याचे काम केले आहे. या कालावधी ज्या ज्या योजना आणल्या त्या चार दिवसात बंद पडल्या आहेत. एकही आश्वासन त्यांनी आजवर पाळलेले नाही. मुळात या भागाचे आमदार म्हणून त्यांची जबाबदारी होती स्टॉल धारकांचे दिलेला आश्वासनाप्रमाणे पुनर्वसन होणे गरजेचे होते. या प्रकरणात आता पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि विस्तापितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही सतीश सावंत यांनी केली.

4