आम. नीतेश राणेंच्या मध्यस्थीने शालेय पोषण आहाराच्या ठेक्याला स्थगिती…

2

दोन दिवसात बैठक घेत अंतिम निर्णय घेणार ; मंदार केणी…

मालवण, ता. ३१ : नगरपालिका क्षेत्रातील शाळांना स्थानिक महिला बचतगटांकडून शालेय पोषण आहाराचे काम काढून घेत ठेकेदारी पद्धतीने देण्याच्या निर्णयाला आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर स्थगिती देण्यात आली. याचे पत्र शिक्षण विभागाच्यावतीने स्वाभीमानचे पदाधिकारी व बचतगटांचे प्रतिनिधींना देण्यात आले.
येत्या दोन दिवसात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, महिला बचतगट, लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक पंचायत समितीत घेतली जाणार असून यात अंतिम निर्णय घेतला जाईल असे स्वाभीमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी स्पष्ट केले.
शहरातील नगरपालिका क्षेत्रात असणार्‍या दहा शाळांना गेली काही वर्षे स्थानिक महिला बचतगटांकडून शालेय पोषण आहार पुरविला जात आहे. यात शिक्षण विभागाने या महिला बचतगटांना ३१ जुलैपासून शालेय पोषण आहार बंद करण्याच्या सूचना देत यापुढे ठेकेदारामार्फत शालेय पोषण आहार पुरविला जाणार असल्याचे पत्र दिले. यामुळे महिला बचतगटांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार असल्याने संबंधित महिला बचतगटांनी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी यांचे लक्ष वेधले. या गंभीर समस्येसंदर्भात स्वाभीमानने आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत तालुक्याच्या बाहेरील ठेकेदाराला ठेका न देता स्थानिक महिला बचतगटांनाच हे काम द्यावे अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.
या समस्येबाबत स्वाभीमानच्या पदाधिकार्‍यांनी आमदार नीतेश राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याची तत्काळ दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना ठेका तत्काळ रद्द करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने ठेकेदारी पद्धतीने पोषण आहार देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. संबंधित ठेक्याला स्थगिती दिल्याचे तसेच स्थानिक महिला बचतगटांच्या माध्यमातूनच शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्राची प्रत यावेळी स्वाभीमानचे पदाधिकारी तसेच महिला बचतगटांच्या प्रतिनिधींना देण्यात आले.
शाळांमध्ये किचनशेडसाठी जागा नसल्याने शालेय पोषण आहार ठेकेदारी पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे याची माहिती घेण्यासाठी येत्या दोन दिवसात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, महिला बचतगट प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे श्री. केणी यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती अशोक बागवे, नगरसेवक यतीन खोत, शिल्पा खोत यांच्यासह शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

7

4