गुणवत्तावाढीसाठी एकदिलाने काम करूया:

2

शिवाजी पवार; खांबाळे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

वैभववाडी.ता,१: शैक्षणिक उपक्रमांचे अंतिम उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच असून शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणा व समाज यांच्या समन्वयातूनच ते साध्य होते. त्यामुळे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एकदिलाने काम करून हे उद्दिष्ट साध्य करूया, असे आवाहन केंद्रप्रमुख शिवाजी पवार यांनी केंद्रशाळा खांबाळे येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत केले.
परिषदेचे उद्घाटन भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात दुसरा व तालुक्यात प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थी अथर्व जयवंत मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी तालुक्यात द्वितीय काव्या दत्तगुरु चव्हाण व तृतीय क्रमांकप्राप्त ईश्वरी विजय केळकर या गुणवंतांचा, त्यांच्या पालकांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पदवीधर शिक्षिका अस्मिता सुतार यांनी इंग्रजी पेटीतील साहित्याची सखोल माहिती दिली. केंद्रप्रमुख शिवाजी पवार यांनी शैक्षणिक नियोजन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, साधनतंत्रे, प्रकल्प, वर्णनात्मक नोंदी इ. विषयी मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या परिषदेत विचारमंचावर मुख्याध्यापक उत्तम पाटील, संजयकुमार शेट्ये, गजानन टक्के, सुप्रिया शेट्ये, सुहास रावराणे आदी मान्यवरही उपस्थित होते. परिषदेदरम्यान विविध विषयांवर झालेल्या गटचर्चेत केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.

15

4