१५ ऑगस्टला होणार उद्घाटन
वैभववाडी,ता.१ : समस्येच्या गर्तेत सापडलेल्या उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राची आमदार नितेश राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिका-यासमवेत पाहणी केली. नव्याने बांधण्यात आलेली व उद्घाटन च्या प्रतिक्षेत असलेली इमारत तसेच वैद्यकीय अधिकारी निवासस्थानांची झालेली दुरावस्था व एकूणच यंत्रणेचा उडालेला बोजवारा याबाबत आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी सायं. 3 वाजता होणार असल्याचे अधिका-याबरोबर झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले.
यावेळी स्वाभिमान तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, शिक्षण व आरोग्य सभापती अनीषा दळवी, माजी सभापती शारदा कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, सरपंच एस. एम. बोबडे, आबा दळवी, किशोर दळवी, उदय मुद्रस, एस. पी. परब, डी.एच. राणे व पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
या आरोग्य केंद्राबाबत स्थानिक नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. त्याची दखल आरोग्य यंत्रणेने गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. उद्घाटनानंतर येथील आरोग्य यंत्रणा सुस्थितीत आली पाहिजे. आरोग्य सेवेबाबतचा चालढकलपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या आरोग्य केंद्रात दोन्ही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. उपस्थित कर्मचारी रुग्णांशी उद्धट वागत असल्याचे सरपंच बोबडे यांनी निदर्शनाला आणून दिले. सदर आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेवर बरेच रुग्ण अवलंबून आहेत. परंतु त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. हे यंत्रणेने थांबवावे असे नासीर काझी यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी अनेक समस्या आ. नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या.