सतीश सावंत: तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा
सिंधुदुर्गनगरी ता.०१
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गत जिल्हा बँकेमध्ये 20 हजाराहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 3 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबात प्रतिवर्षी रुपये सहा हजार एवढे आर्थिक सहाय्य अनुदान तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची कार्यवाही शासनामार्फत सुरू आहे. या योजनेंतर्गत सहाय्य अनुदान जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला सेविंग खाते क्रमांक दिलेला आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेमध्ये वीस हजाराहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीन कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या रकमा जमा करण्याची कार्यवाही शासनाकडून सुरू आहे. काही तांत्रिक कारणांमुळे सहाय्य अनुदान रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्या नसल्यास अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचेकडून माहिती घ्यावी. जिल्हा बँकेकडून ही शेतकऱ्यांना शासन योजनेच्या लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे.