रुग्णालयाने दर्जेदार सेवा द्यावी असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन ः पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेच्या कक्षाचेही उद्घाटन
कणकवली, ता.१ : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशिनमुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे. गोरगरीब रुग्ण, महिला यांना या सोनोग्राफी मशिनचा लाभ होईल. उपचारासाठी या मशिनचा चांगला उपयोग होईल. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी चांगले आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनी देखील स्थानिक गरजा पाहून रुग्णालयाला आवश्यक साहित्य, यंत्रसामग्री द्यावी. या रुग्णालयातून गरीब होतकरू रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे नवीन सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना, एएनसी तपासणी कक्षाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, रुग्णालय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील, डॉ. सतीश टाक, डॉ. सी.एम.शिकलगार, रेडिओलॉजीस्ट डॉ. संतोष चौगुले, मनोहर परब, रुग्णालय कर्मचारी, परिचारिका उपस्थित होते.
समीर नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला आवश्यकते सहकार्य आम्ही करायला तयार आहोत. कणकवलीत सोनोग्राफी मशिनमुळे रुग्णांना चांगली सेवा द्यावी. डायलिसिस मशिन आलेले आहेत. त्यासाठी लागणारा फिल्टर प्लॅन्ट त्वरित चालू करावा. हे रुग्णालय नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात नसल्याने थेट निधी देता येणार नाही. कणकवली शहर संवेदनशील आहे. मात्र प्रामाणिक काम करणार्या डॉक्टरांना किंवा कर्मचार्यांना आम्ही केव्हाही त्रास देत नाही.
डॉ. धनंजय चाकूरकर म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशिनमुळे आता रुग्णांची गैरसोय कमी होईल. या रुग्णालयात येणार्या रुग्णांना रेफर करू नका. त्या रुग्णांचे पहिल्यांदा ऑडिट केले पाहिजे. फारच गंभीर रुग्ण असेल तर येथून पुढे रेफर करा, नाहीतर जनमानसात प्रतिमा वाईट होते. वैद्यकीय अधिकाजयांनी घाबरून न जाता रुग्णांवर उपचार केले पाहिजेत. आवश्यकत्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व आमचे सहकार्य घ्यावेत. डॉक्टर आणि लोकप्रतिनिधी समाजासाठीच काम करत आहे.
डॉ. सहदेव पाटील म्हणाले, गर्भवती मातांना 1 ते 50 दिवसांमध्ये नोंदणी झाल्यास 5 हजारपर्यंत आर्थिक मदत पंतप्रधान मातृत्व योजनेतून देत आहोत. त्यासाठी गरोदर मातांनी आपली नावनोंदणी करावी. तसेच या रुग्णालयात आता सोनोग्राफी मशिन व गरोदर माता तपासणी स्वतंत्र केल्यामुळे रुग्णांना त्रास होणार नाही. दर महिन्याला या रुग्णालयाचे 70 ते 80 हजार रुपयाचे बिल खासगी सेवा धारकांना द्यावे लागत होते ते आता थांबतील.
या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणारे डॉ. सी.एम.शिकलगार, डॉ. संतोष चौगुले, डॉ. सतीश टाक यांचा सत्कार नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला.