जिल्हा परिषद शाळा मर्यादीत ः युवा संदेश आणि स्वाभिमान पक्षाचे आयोजन
कणकवली, ता.1 ः तालुक्यातील कनेडी-सांगवे बाजारपेठ येथे 25 आणि 26 ऑगस्टला जिल्हा परिषद शाळा मर्यादीत तालुकास्तरीय समुहगीत गायन स्पर्धा होणार आहे. कै.सुधीर सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आणि स्वाभिमान पक्ष नाटळ – सांगवे विभागीय कार्यालय यांच्यावतीने हा कार्यक्रम होत आहे.
स्पर्धेत सहभागी होणार्या एका संघामध्ये शाळेचे जास्तीत जास्त दहा विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. समुहगीत हे देशभक्तिपर किंवा स्फूर्तीगीत आवश्यक आहे. संगीतसाथ करण्यासाठी फक्त भारतीय वाद्यांचा वापर करता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करता येणार नाही. गीत सादर करण्यासाठी सात मिनिटे व रंगमंचावरील तयारीसाठी पाच मिनिटे वेळ दिला जाणार आहे. वाद्यवृंद कणकवली तालुक्यातीलच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक अथवा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
समुहगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता होईल. तर स्पर्धा संपताच पारितोषिक वितरण होणार आहे. यात पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार., तीन हजार व दोन हजार रुपये तसेच उत्कृष्ट पखवाज, हार्मोनियम वादक यांना प्रत्येकी एक हजार रुपये तसेच सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत नाव नोंदणीसाठी अजय सावंत (9420051654) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे.