विशेष बाब म्हणून पालकमंत्र्यांनी दिली मंजुरी ; नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती…
मालवण, ता. १ : शहराची जलवाहिनी असलेल्या धामापूर नळपाणी योजनेच्या १२० अश्वशक्तीच्या पंपामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत होत्या. काहीवेळा एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याची वेळ येत होती. त्यामुळे नव्या पंप खरेदीचा २६ लाख २३ हजाराचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तत्काळ मंजुरी दिली आहे.
दरम्यान लवकरात लवकर निविदा प्रक्रिया होऊन नव्या पंपाची खरेदी नगरपालिकेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
नळपाणी योजनेच्या पंपात वारंवार होणार बिघाड व त्यामुळे ग्राहक नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात होणारा खंड विचारात घेता नवा पंप खरेदी करण्याबाबत निर्णय झाला. मात्र पंपासाठी २५ लाखाहून अधिक रक्कमेची गरज होती. त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून २६ लाख २३ हजार रुपये निधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. याबाबत आम. वैभव नाईक यांनी पाठपुरावा करत निधी मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार विशेष बाब म्हणून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.