भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम ; सलग तिसऱ्या वर्षी पाठविल्या राख्या…
मालवण, ता. १ : भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे अनोखे नाते सांगणाऱ्या रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर येथील भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीकडून सलग तिसऱ्या वर्षी भारतीय जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावर्षी तब्बल १२,२०० एवढ्या विक्रमी राख्या पाठविण्यात आल्या.
भूदल, नौदल व वायुदल या तिन्ही दलातील जवानांना राख्या पाठविण्यात आल्या असून या सर्व राख्या विद्यार्थिनींनी स्वतः बनवल्या आहेत. “रक्ताचे नाते असलेला भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करतो, मात्र आपण भारत मातेचे रक्षण करत आहात, देशसेवेचे हे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो” असा शुभसंदेशही विद्यार्थिनींनी या आपल्या सीमेवरील भावांना राख्यांसोबत दिला.
रक्षाबंधन निमित्त भारतीय सैनिकांना राख्या पाठवून त्यांच्या बद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी राबविला. या उपक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. एस. एस. टिकम, प्रा. पवन बांदेकर, आणि संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी, बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सुमारे दीडशे विद्यार्थिनींनी गेले महिनाभर मेहनत घेत स्वतःच्या हाताने विविध प्रकारच्या तब्बल १२,२०० राख्या बनविल्या. या उपक्रमासाठी टेक्नोवा कंपनी, मुंबईचे संचालक मंगेश कुलकर्णी यांचे आर्थिक सहाय्य मिळाले. जवानांना पाठविल्या जाणाऱ्या राख्यांचे प्रदर्शन आज प्रशालेत मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी जय जवान, जय किसान… भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काही विद्यार्थिनींनी जवानांप्रति प्रेम व आदर व्यक्त करणाऱ्या कविताही सादर केल्या. यानंतर या राख्या पोस्टाद्वारे भारतीय सैन्याच्या विविध तुकड्यांना पाठविण्यात आल्या. यामध्ये लष्करासाठी पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार, तसेच वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पुलवामा, लेह, जम्मू आणि काश्मीर, उधमपूर आदी ठिकाणी देश रक्षणाचे कार्य करणाऱ्या जवानांना या राख्या पाठविण्यात आल्या.
यावेळी प्रा. बांदेकर यांनी या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थिनींचे कौतुक केले. प्राचार्या सौ. टिकम यांनी जवान आपले सर्वस्व पणाला लावून देशाचे रक्षण करतात याची जाणीव ठेवून आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बंधुप्रेमाचे प्रतिक म्हणून राख्या पाठविण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे सैनिकांकडूनही कौतुक होत आहे असे सांगत यापुढेही कनिष्ठ महाविद्यालयामार्फत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी १०० हुन अधिक राख्या बनविणाऱ्या ३९ विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सुचिता केळुसकर (८६८) व चैताली केळुसकर (८००) यांनी सर्वाधिक राख्या बनविल्या.
या उपक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वामन खोत, प्रा. अजित परुळेकर, प्रा. सुनंदा वराडकर, प्रा. स्नेहल पराडकर, प्रा. संपदा कोयंडे, प्रा. आजगावकर, प्रा. गुरुदास दळवी, प्रा. देवेंद्र चव्हाण, प्रा. प्रभू, प्रा. सावंत, प्रा. वाक्कर, प्रा. सरोज बांदेकर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी कौतुक केले आहे .