संजय भेडगे; सावंतवाडीत आयोजित कामगार मेळाव्याला उत्फुर्त प्रतिसाद…
सावंतवाडी ता.०२: साठ वर्षे झालेल्या कामगारांना पेन्शन देता येवू शकते का ? यासाठी शासन विचाराधिन आहे.सर्वसामान्य कामगारांच्या कुंटूबाची काळजी करणारे सरकार सत्तेत आहे.त्यामुळे कामगारांनी भविष्याची चिंता करू नये तर त्यांना आरोग्य,घर,शिष्यवृत्ती आणि सुरक्षेची जबाबदारी आमची,अशी हमी राज्याचे कामगार राज्यमंत्री संजय भेडगे यांनी आज येथे दिली. दरम्यान कामगारांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदणी प्रकीया पुर्ण करावी,जास्तीत-जास्त लोकांना याचा लाभ मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.जे अधिकारी कामगारांना सहकार्य करणार नाहीत त्यांचे निलंबन केले जाईल असे ही यावेळी भेडगे यांनी सांगितले.
भाजपाच्यावतीने आज येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते तब्बल १२५ लोकांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले .यावेळी माजी आमदार राजन तेली,उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर,मनोज नाईक,दादू कविटकर,शरद चव्हाण,आनंद नेवगी,रामचंद्र टेंब्ाूलकर,शितल राउळ,प्रसाद अरविंदेकर,कीरण कुबल,विश्वास जाधव,परिणीता वर्तक,धनश्री गावकर,अब्दूल साठी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.भेडगे पुढे म्हणाले या ठीकाणी शासनाच्या माध्यमातून कामगारांना बळकट करण्यासाठी आवश्यक त्या विविध योजना अमंलात आणण्यात आल्या आहेत.त्यासाठी आवश्यक असलेला कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे.त्यामुळे येणार्या काळात कामगारांचे बळकटीकरण हा मुख्य उद्देश्य डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.त्यात आरोग्य सेवा,शिष्यवृत्ती,भूमिहीनांना व बेघरांना घरे आणि सुरक्षा आदींचा समावेश आहे.तसेच साठ वर्षे झालेल्या कामगारांना पेन्शन देता येवू शकते का यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.
यावेळी श्री तेली म्हणाले जिल्ह्यात जास्तीत जास्त कामगार कुंटूबांना याचा फायदा होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत भविष्यात या ठीकाणी दहा हजार कामगारांची नोंदणी करण्याचे उदीष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करण्यात येणार आहे.त्यासाठी आवश्यक असलेली अंतिम मुदत वाढवून घेण्यात आली आहे.त्यामुळे याचा फायदा कामगार व त्यांच्या कूंटूबियांनी घ्यावा दरम्यान आरोग्यसाठी देण्यात येणार्या मदतीत काही वगळण्यात आलेल्या आजारांचा समावेश करून घेण्यात यावा अशी प्रमूख मागणी यावेळी श्री.तेली यांनी केली या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.