स्वच्छ्ता अभियानात जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी सहभाग घ्यावा

218
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नवीन निकषासह 1 ऑगस्ट पासून प्राधान्य जी. प. अध्यक्षा सौ सावंत यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी.ता,२: ग्रामिण स्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उददेश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा आहे. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अभियान-कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागाच्या माध्यमातून, कार्यक्रमाचा आपलेपणा व महत्त्व पटवून देण्याकरिता सन २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यांत येत आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल व सुधारणा करुन सन २०१९-२० करीता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान १ ऑगस्ट २०१९ पासुन सुरु करण्यात आले आहे. या अभियांनात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा असे आवाहन जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.
सन २०१९-२० या वर्षासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत घेण्यांत येणाऱ्या स्पर्धाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्यांत आल्या आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती व स्वच्छ जिल्हा परिषद अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
या अभियानातर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानातर्गत उत्कृष्ट प्रभागाकरीता रक्कम रुपये १० हजार, जिल्हा परिषद गटाकरीता रक्कम रुपये ५० हजार, जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक ५ लक्ष, व्दितीय क्रमांक ३ लक्ष तृतीय क्रमांक २ लक्ष बक्षिस तर विभागस्तरावर विजेत्या प्रथम क्रमांक १० लक्ष, व्दितीय क्रमांक ८ लक्ष तृतीय क्रमांक ६ लक्ष बक्षिस रक्कमा जाहिर करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरावर विजेत्या ग्रामपंचायतीना अनुक्रमे प्रथम क्रमांक ४० लक्ष, व्दितीय क्रमांक २५ लक्ष तृतीय क्रमांक २० लक्ष बक्षिस ठेवण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- सांडपाणी व्यवस्थापन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, स्व, आबासाहेब खेडकर पुरस्कार- शौचालय व्यवस्थापन असे विशेष पुरस्कार जिल्हा, राज्य व विभागस्तरावर देण्यात येणार आहेत.
स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- सांडपाणी व्यवस्थापन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, स्व, आबासाहेब खेडकर पुरस्कार- शौचालय व्यवस्थापन अंतर्गत जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपचायतीना जिल्हास्तरावर रक्कम रुपये २५ हजार व विभागस्तरावर रक्कम रुपये ३० हजार तर राज्यस्तरावर रक्कम रुपये २ लक्ष अशी बक्षिस रक्कम पुरस्कार म्हणुन देण्यात येणार आहे.
राष्ट्रपिता महात्ना गांधी स्वच्छ पंचायत समिती स्पर्धेंतर्गत प्रथम क्रमांकास रक्कम रुपये ५० लक्ष, व्दितीय क्रमांकास रक्कम रुपये ३० लक्ष, तृतीय क्रमांकास रक्कम रुपये २५ लक्ष तर राष्ट्रपिता महात्ना गांधी स्वच्छ जिल्हा परिषद स्पर्धेंतर्गत प्रथम क्रमांकास रक्कम रुपये १ कोटी, व्दितीय क्रमांकास रक्कम रुपये ७५ लक्ष, तृतीय क्रमांकास रक्कम रुपये ५० लक्ष बक्षिस रक्कम जाहिर करण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानांत “उत्कृष्ट प्रभाग” स्पर्धा, जिल्हा परिषद गट स्पर्धा, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर अशा वेगवेगळ्या स्तरावरुन प्राप्त होणा-या बक्षिसांच्या रक्कमांचा विनियोग स्वच्छतेशी निगडित उपक्रमांवर तसेच स्वच्छतेच्या अनुषंगाने ज्या सफाईकामगारांनी उत्कृष्ट काम केले आहे, अशा उत्कृष्ट कामगाराची निवड करण्यात येऊन स्पर्धेमध्ये प्राप्त होणा-या पुरस्कारांच्या रकमेपैकी या अभियांनात उत्कृष्ट सफाईकामगार जिल्हा परिषद गट स्तरावर रक्कम रुपये २५००, जिल्हास्तर रक्कम रुपये ५० हजार, विभागस्तर रक्कम रुपये ७५ हजार, राज्यस्तरावर रक्कम रुपये १ लाख रोख रक्कम पुरस्कार म्हणुन देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली आहे.

\