मालवण येथील ज्येष्ठ बेकरी उदयोजक भाई तायशेट्ये यांचे निधन…

2

मालवण, ता. २ : महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्राप्त आणि जुन्या पिढीतील व्यापार उदिमाची नव्या पिढीशी नाळ जोडणारे ज्येष्ठ बेकरी उद्योजक भाई ऊर्फ मोहन विठ्ठल तायशेट्ये (वय-८३) यांचे आज दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
माडखोल- सावंतवाडी येथून आपल्या वडिलांसोबत मालवण येथे आलेल्या भाई तायशेट्ये यांनी अनेक अडचणींचा सामना करत बेकरी व्यवसाय सुरू केला. जुन्या काळात दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नसताना डोक्यावर टोपली घेऊन त्यांनी पाव, नानकटाई यांसारख्या बेकरी उत्पादनाची विक्री घरोघरी फिरत करून व्यवसायास सुरवात केली. अपार कष्ट घेत त्यांनी सन १९६४ मध्ये विजया बेकरी या नावाने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने त्यांनी विविध प्रकारची उत्पादने घेत विजया बेकरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
उद्योग क्षेत्रातील त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेत भाई तायशेट्ये यांना सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित केले. गेली काही वर्षे ते कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होते. आज दुपारी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. शनिवारी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष व बेकरी व्यावसायिक नितीन, विकास तायशेट्ये यांचे ते वडील तर मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे ते चुलत सासरे होत.

23

4