_नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; पाणलोट क्षेत्रात पाण्याची झपाट्याने वाढ_
वैभववाडी. ता,२: गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात पावसाची जोरदार बॕटींग सुरू असून अरुणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यवृष्टी होत आहे. तरी पाणलोट क्षेत्रातील नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन उपअभियंता मध्यम प्रकल्प विभागीय पथक आंबडपाल यांनी केले आहे.
अरुणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे अरुणा धरणाच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणामध्ये अतिरिक्त येणारे पाणी धरणातील उंबर पातळी(१४६.५० मी) पेक्षा पाणी पातळी ज्यादा झाल्यानंतर धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा अनियंत्रित प्रवाह वाहणार आहे.
त्यामुळे धरणातून नदी पात्रात कोणत्याही क्षणी पाणी प्रवाह चालू होणार आहे. तसेच धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्रातील पाणी नदी पात्रात येवून नदी पात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नदी पात्रातील पाण्याचाही वेगही वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांनी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नदी पात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.