जिल्हा प्रशासनाने दिलेला ठेका अखेर रद्द : स्वाभिमानच्या इशाऱ्यामुळे प्रशासन नरमले…
मालवण, ता. २ : शहरातील शाळांमध्ये स्थानिक महिला बचतगटांमाफत दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा ठेका रद्द करत जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून पोषण आहार शिजवून देण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला. या निर्णयाविरोधात स्वाभिमान पक्षाच्या नेतृत्वाखाली बचतगटातील महिलांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागले. स्थानिक महिला बचतगटांकडूनच शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय आज सायंकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शहरातील शालेय पोषण आहाराचे काम महिला बचतगटांकडे असून शहरातील १३ बचतगटांच्या १०० महिला यातून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र अलीकडेच शासनाने परिपत्रक काढले. त्यानुसार बचतगटांकडील पोषण आहाराचे काम काढून घेत ठेकेदार एजन्सी नियुक्ती करून पोषण आहार शिजवून देण्याचा निर्णय घेतला. याबाबत शिक्षण विभागाने शहरातील १५ शाळांना आदेश काढून १ ऑगस्टपासून पोषण आहार संबंधित ठेकेदाराकडून घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बचतगटातील महिलांनी स्वाभिमान पक्षाच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीत शिक्षण विभागाच्या अधिकार्यांची भेट घेऊन या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शहराबाहेरील ठेकेदाराला पोषण आहाराचे काम करु देणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानने घेऊन संबंधित ठेकेदाराचा ठेका तत्काळ रद्द करून पूर्ववत महिला बचतगटांमाफत हे काम सुरू ठेवण्याची मागणी केली होती. आमदार नीतेश राणे यांनी देखील जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना प्रशासनाला त्यासंबंधीचे आदेश देण्याची सूचना केली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला पुढील निर्णय होईपर्यंत अंतरिम स्थगिती दिली होती.
शहरातील काही शाळांनी पोषण आहार शिजविण्यासाठी आपल्याकडे जागा उपलब्ध नसल्याचे कारण दिल्याने याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी पंचायत समितीच्या सभागृहात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, महिला बचतगटाच्या प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत टोपीवाला प्राथमिक शाळा वगळता इतरांनी बचतगटांसाठी जागा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली. टोपीवाला प्राथमिक शाळेच्या संस्था चालकांशी बोलून या विषयावर मध्यस्थी करण्याचे स्वाभिमान तालुकाध्यक्ष मंदार केणी व अन्य लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिल्यानंतर पोषण आहारासाठी कणकवलीच्या ठेकेदाराला मिळालेला ठेका रद्द करण्याचा निर्णय राजेंद्र पराडकर यांनी दिला. महिला बचतगटांवर अन्याय होऊ नये यासाठी प्रशासनाने पोषण आहाराचा ठेकेदाराला दिलेला ठेका रद्द केला असून बचतगटांनी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करु नये. पोषण आहारासाठी आलेले धान्य निकृष्ट दर्जाचे असेल तर तत्काळ प्रशासनाला माहिती द्या. पण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा पोषण आहार मिळाला पाहिजे, अशा सूचना श्री. पराडकर यांनी केल्या.
या बैठकीस नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपसभापती अशोक बागवे, पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर, कमलाकर गावडे, विनोद आळवे, मनीषा वराडकर, नगरसेवक ममता वराडकर, यतीन खोत, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्यासह शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि बचतगट प्रतिनिधी उपस्थित होते.