सुनील घाडीगांवकर ; पंचायत समितीच्या सभेत सूचना…
मालवण, ता. २ : तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात गणेशोत्सवास सुरवात होत असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती याच महिन्यात करावी. गतवर्षी गणपती बाप्पांचे आगमन खड्ड्यांतून झाले. त्यामुळे यावर्षी तरी खड्डेमुक्त रस्ते बनविण्यासाठी सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रयत्न करावे अशा सूचना पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर यांनी आज पंचायत समितीच्या मासिक सभेत केल्या.
येथील पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजीराजे सभागृहात प्रभारी सभापती अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगावकर, निधी मुणगेकर, मनीषा वराडकर, छाया परब, मधुरा चोपडेकर, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व खात्याच्या खातेप्रमुखांनी, अधिकार्यांनी प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी, गुरुवारी कार्यालयात उपस्थित राहून ग्रामीण भागातून येणार्या जनतेच्या समस्या दूर कराव्यात असे आवाहन श्री. बागवे यांनी केले.
तालुक्यातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्यांचे डांबरीकरणही उखडून गेले आहे. मालवण कसाल आणि मालवण नेरूरपारमार्गे कुडाळ हे रस्ते धोकादायक बनले आहेत. बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांचे खड्डे गणेश चतुर्थीपुर्वी डांबरीकरणाने बुजविणे गरजेचे आहे. गतवर्षीचा अनुभव वाईट आहे. यामुळे यावर्षी आम्ही गप्प बसणार नाही. दोन्ही बांधकाम विभागांनी आपापल्या विभागातील रस्ते सुस्थितीत आणि झाडी हटवायला हवी अशी सूचना सुनील घाडीगावकर यांनी केली.
अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांची ऑनलाइन माहिती घेताना समस्या भासत आहे. यामुळे ग्रामपंचायतीमार्फत ग्रामीण भागातील शाळांनाही इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. अत्यंत धोकादायक बनलेल्या शाळांची दुरुस्ती तत्काळ व्हायला हवी असे राजू परुळेकर यांनी सांगितले. यावर गटविकास अधिकारी श्री. पराडकर यांनी शिक्षण विभागाने तालुक्यातील तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असलेल्या दोन ते तीन शाळांची नावे द्यावीत अशी सूचना केली. शिक्षण विभागाने तालुक्यातील २९ शाळांची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
तालुक्यातील शाळांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी किचनशेडची आवश्यकता असल्याने अनेक शाळांमध्ये अनेक वर्ग वर्षानुवर्षे बंद असल्याने मुख्य शाळेच्या वर्गांपासून लांब असलेल्या एखादा वर्ग किचनशेडसाठी वापरण्यास द्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशी सूचना घाडीगावकर यांनी केली. यावर शासन आदेश तपासून कार्यवाही करावी असे आदेश गटविकास अधिकारी श्री. पराडकर यांनी दिले.