बांधकाम कामगारांची स्वप्ने मुख्यमंत्री पूर्ण करणार : राज्यमंत्री भेगडे

2

वेंगुर्ले : ता.२ लोकांच्या घरांची स्वप्ने बांधकाम कामगार पूर्ण करतात. तर आता बांधकाम कामगारांच्या स्वतःच्या घरांची स्वप्ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करणार आहेत. यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील ज्या बांधकाम कामगारांच्या कच्च्या घरांचा येत्या १५ दिवसांत सर्व्हे करण्याचे तोंडी आदेश कामगार, पर्यावरण मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी येथील अधिकाऱ्यांना दिले. सदरचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून बांधकाम कामगारांना स्वतःची घरे मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी वेंगुर्ल्यातील कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरण प्रसंगी दिले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि सरकारी कामगार अधिकारी सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज सायंकाळी येथील साई दरबार हॉल येथे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरण कार्यक्रम पार पडला. कामगार,पर्यावरण मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. वितरण प्रसंगी व्यासपिठावर रत्नागिरीचे सहाय्यक कामगार आयुक्त विश्वास जाधव, भाजपाचे प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण, माजी आम. राजन तेली, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, तहसिलदार प्रविण लोकरे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक श्रेया मयेकर, सुहास गवंडळकर, कामगार कल्याण विभागाचे किरण कुबल, श्री. टेंबुलकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते. तालुक्यातील १२० नोंदणी बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरीत करण्यात आले. सुमारे १२ हजार रुपये या संचाची किमती असून यात हल्मेट, हॅण्डग्लोज, बुट, जाकेट,सतरंजी, जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल यांसह अन्य लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. वेंगुर्ला तालुक्यातील ७५० बांधकाम कामगारांची नोंदणी करणाऱ्या विजय बागकर याचा राज्यमंत्री भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे मार्गदर्शन करताना राज्यमंत्री भेगडे म्हणाले की, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात साडेचार कोटी संख्या ही संघटीत व असंघटीत कामगारांची आहे. अंगमेहनत करणाऱ्या कुठल्याही व्यवसायाचा समावेश या बांधकाम कामगारांमध्ये होतो. अशा कामगारांना सहज उपलब्ध होतील अशा योजना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणल्या असल्याचे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विविध योजनांची माहिती देऊन या सर्व योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजन तेली, स्नेहा कुबल, तहसिलदार प्रविण लोकरे, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास जाधव,सूत्रसंचालन काका सावंत यांनी तर आभार तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी मानले.

 

4

4