वाहून जाणाऱ्या होड्या वाचविण्यात स्थानिकांना यश…
आचरा, ता. २ : समुद्री उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका तोंडवळी तळाशिल भागाला बसला आहे. तोंडवळी- तळाशिल किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धुप होत आहे. समुद्राचे पाणी तळाशिल किनारपट्टीच्या काही भागात घुसल्याने येथील जमिनीचा बराचसा भाग समुद्राने गिळंकृत केला आहे. किनाऱ्यावर ओढून ठेवलेली कोळीदेव रापण संघाची होडीकडचा जमिनीचा भाग समुद्रात धूप होउन वाहून गेल्याने
कोळीदेव रापण संघाची होडी समुद्रात वाहून जात होती. तळाशिलच्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्नांनी होडी किनाऱ्यावर आणल्याने त्यांना होडी वाचवण्यात यश आले.
वेगाने येणाऱ्या उधाणाची लाटांच्या वाऱ्यामुळे तोंडवळी किनारपट्टीची वेगाने धुप होत आहे. आज आलेल्या उधाणाचा तडाखा तोंडवळी- तळाशिल किनाऱ्याला मोठ्या प्रमाणात बसला. यात बंधारा नसलेल्या भागातील ३० फुट रूंदीचा भूभाग आज समुद्राने गिळंकृत केला आहे. वारंवार मागणी करूनही उर्वरित बंधारा होत नसल्याने तळाशिल ग्रामस्थांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आज आलेल्या उधाणामुळे पुन्हा एकदा तोंडवळी- तळाशिल गावच्या किनारी भागाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी प्रमाणे आलेल्या उधाणात तोंडवळी-तळाशिल किनाऱ्याचा काही भाग काही क्षणात समुद्राने गिळंकृत केला. पावसाळ्यापुर्वी कोळीदेव रापण संघाची होडी किनाऱ्यावर काढून सुरक्षित जागेत ठेवली होती. मात्र आज आलेल्या उधाणामुळे होडीपर्यंतचा भाग लाटांच्या तडाख्यात वाहून गेला. यामुळे रापण संघाची होडीही लाटांच्या तडाख्यात सवडल्याने वाहून जात होती. तळाशिल येथील ग्रामस्थ पंढरीनाथ सादये,
चंद्रकांत सादये, बाळा पेडणेकर, गौरव मालंडकर, विवेक खेडकर, रमा तांडेल, दत्तात्रय बापर्डेकर, लवू तारी यांनी धाव घेत काही तासाच्या प्रयत्नानी होडी किनाऱ्यावर आणली. यात होडीचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.