शाळा व अंगणवाडी मधील १ ते १९ वयोगटातील १ लाख ६३ हजार १०८ मुलांना गोळी खाऊ देणार
सिंधुदुर्गनगरी.ता,३: मानवी शरीरातील कृमिं रक्ताची हानी करून कुपोषणाला निमंत्रण देतात त्यामुळे यावर मात करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागामार्फत ८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये “राष्ट्रिय जंतनाशक दिन मोहीम” राबविलि जाणार आहे. या दिवशी १ ते १९ वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळी खाऊ दिली जाणार आहे. यात १५८८ अंगणवाडी व १६७८ शाळा यांमधील १ लाख ६३ हजार १०८ मुला मुलींचा समावेश असणार आहे. तर ८ ऑगस्ट रोजी शाळा अंगणवाड्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या मुलांना १६ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
कृमीदोष होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तीक व परिसर स्वच्छतेचा अभाव हे आहे. बालकांमधील दीर्घकालीन कृमीदोष हा मुलांना अशक्त करणारा आहे. तसेच रक्तक्षय व कुपोषणाचे कारण तर आहेच, तसेच बैद्धिक व शारिरीक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. तर राऊंड वर्म आतड्यातील अ जीवनसत्वावर परिणाम करतात.
कृमीदोषमुळे होणार दुष्परिणाम विचारात घेऊन केंद्र शासन मागील तीन वर्षांपासून दर सहा महिन्यांनी राष्ट्रीय स्तरावर जंतनाशक दिन ही संकल्पणा राबवित आहे. यावर्षी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग फेब्रुवारी मध्ये राबविली होती. या मोहिमेचा दूसरा टप्पा म्हणून गुरुवार दि ८ ऑगस्ट रोजी जंतनाशक गोळ्या वाटप मोहिम राबविली जाणार आहे. या दिवशी १ ते १९ वयोगटातील सर्व १६७८ शाळा (प्राथमिक, माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित) आणि १५८८ अंगणवाडी मधील १ लाख ६३ हजार १०८ मुलांना शाळा व अंगणवाडीच्या वेळेत जंतनाशक गोळी खायला दिली जाणार आहे. ८ ऑगस्ट रोजी जी मुले अनुपस्थितीत राहणार त्यांना १६ ऑगस्ट रोजी या गोळ्या खाऊ दिली जाणार आहे. त्यामुळे जंतनाशक गोळ्या वाटपा दिवशी सर्व पालकानी आपल्या मुलांना न चुकता शाळेत पाठविण्यात यावे असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.