विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधन्यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिप समोर धरणे आंदोलन

261
2

सिंधुदुर्गनगरी.ता,३: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील डीसीपीएस धारक प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्या सोडविण्याकडे जिप प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केला असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी आज जिप समोर धरणे आंदोलन छेडले.

हक्काचा वेतन फरक मिळालाच पाहिजे… हक्काची वेतनश्रेणी मिळालीच पाहिजे… आदी विविध घोषणा देत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाताड़े यांच्या नेतृत्वाखाली जिप समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी नंदकुमार सोनटक्के, चिदानंद कोळी, राजू वजराटकर, संघटनेचे तालुका पदाधिकारी आदि उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील डीसीपीएस धारक प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी होत असलेला विलंब, सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता रोखीने अदा करण्यास झालेला विलंब, पदवीधर पदोन्नतीमध्ये बारावी शास्त्र तसेच विज्ञान-गणित विषयासह बी.एड. उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना विना अट सामावून घेण्याबाबत होत असलेला विलंब याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिप प्राथमिक शिक्षण विभागाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. प्रसंगी आंदोलनेही करण्यात आली. मात्र संबंधित समस्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडले.

फोटो ओळ-: विविध मागण्यांसाठी जिप समोर धरणे आंदोलन छेडताना जुनी पेन्शन हक्क संघटना पदाधिकारी.

4