सिंधुदुर्गनगरी.ता,३: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे व शिक्षणासंबंधीचे अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत. संघटनेने या विविध प्रश्नांसंबंधी वेळोवेळी निवेदने देऊन जिप प्रशासनाशी चर्चा केली आहे. परंतु ती पूर्तता करण्याचे केवळ आश्वासन दिले जाते. त्याची पूर्तता होत नाही तसेच प्राथमिक शिक्षकांच्या काही समस्या तर अधिक जटील बनत चालल्या असून प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप करत हे प्रश्न त्वरित सोडविण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हा परिषद भवनासमोर एकदिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.
प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांकडे जिप प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे यांच्या नेतृत्वाखाली आज जिप समोर प्राथमिक शिक्षकांनी धरणे आंदोलन छेडले. यावेळी समितीचे सरचिटणीस चंद्रसेन पाताड़े, नामदेव जांभवडेकर, राजन कोरगावकर, यांच्यासह शेकडो प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.
कमी पटाच्या नावाखाली जि.प.शाळा बंद करू नयेत, प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारीखलाच करण्यात यावे. कर्मचारी/शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारीखलाच करावे, परिभाषित अंशदान पेन्शन योजनेतील शिक्षकांचे संपूर्ण हिशोब तक्ते मिळावेत व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा द्याव्यात. ऑनलाईन कामासाठी शाळांना कोणत्याही सोयीसुविधा पुरविण्यात न आल्याने शिक्षकांवर ऑनलाईन कामांची सक्ती करण्यात येऊ नये. वरिष्ठ (चट्टोपाध्याय) निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर करणे. जिल्हान्तर्गत बदलीत अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय देणे. आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करावा. सिंधुदुर्गचा समावेश करावा. शिक्षण समिती स्वीकृत सदस्य पद भरण्यास विनाकारण विलंब टाळून लवकर नियुक्ती द्यावी. उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांना पदावनत करण्यासाठी दबावतंत्र वापरणे बंद करावे. शाळांना देय असणारी अनुदाने विनाविलंब मिळावीत. शाळांना मागील थकीत सादिल अनुदान तसेच पाठयपुस्तके व शैक्षणिक साहित्य वाहतूक भत्ते,विविध प्रशिक्षणांचे भत्ते मिळावेत आदी विविध प्रश्नांसंबंधी प्राथमिक शिक्षकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या व प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी आज दुपारी २ ते ५ या वेळेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिप भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.