सिंधुदुर्गनगरी.ता,३: वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखाण्यात होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरुन दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रूग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत. जिल्हा रूग्णालयात आज दुपारी बारा वाजेपर्यंत विविध आजाराच्या ४५० रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान, ही सर्व स्थिती पाहता जिल्हयातील जनतेने घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो तापाचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू,मलेरिया,स्वाईन फ्लू चे रूग्ण आढळले नसले तरी साध्या तापाने बहुतांशी जण हतबल झाले आहेत. हवामानातील विलक्षण बदलाने जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हयातील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांसह आरोग्य केंद्र व उपकेंद्रात तापसरीने फणफणले रूग्ण दाखल होत आहेत. बहुतेक रूग्ण खासगी दवाखाण्यात दाखल होऊन उपचार करून घेत आहेत. काही रूग्णांना शासकीय रूग्णालयांसह खासगी रुग्णालयात अॅडमीट करून घेतले आहे.
जिल्हा रूग्णालयाचे दक्षता घेण्याचे आवाहन
तापाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ चंद्रकांत चाकूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ श्रीपाद पाटील यांनी जनतेला तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ताप आल्यास तत्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होवून रक्त तपासणी करा. शेतीची कामे करताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असेही द्वयींनी सांगितले.
केस पेपर व औषध घेण्यासाठी रांगाच रांगा
ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास ४५० रूग्णांनी तपासणीसाठी नोंद केली होती. यात बहुतांशी रूग्ण हे सर्दी,ताप,खोकल्याचे होते. दुपारी एक वाजेपर्यंत ओपीडी सुरू असल्याने केस पेपर काढण्यासाठी रूग्णांची रांग लागली होती. तर तपासणी करून आलेले रूग्ण रांगेत राहून औषध खरेदी करत होते.
फोटो ओळ
जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले रूग्ण तर दुस-या छायाचित्रात मोफतऔषध घेण्यासाठी लागलेली रांग(छायाचित्र गिरीश परब)