देवबागला सागरी अतिक्रमणाचा फटका… देवबागच्या संरक्षणासाठी चिवला बिचच्या धर्तीवर टेट्रापॉड बंधारा उभारणार ; माजी खास. नीलेश राणेंची ग्वाही…

2

मालवण, ता. ३ : पाच वर्षांत सत्ताधारी देवबाग गावात एक दगड लावू शकले नाहीत ते विकास काय करणार ? असा प्रश्‍न करत नारायण राणे यांच्या माध्यमातून देवबाग गावच्या संरक्षणासाठी चिवला बीच प्रमाणे टेट्रापॉड बंधारा बांधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही माजी खासदार नीलेश राणे यांनी आज देवबागच्या ग्रामस्थांना दिली.
आज दुपारील समुद्राला उधाणाचा जबरदस्त तडाखा देवबाग गावास बसला. समुद्री लाटांच्या पाण्याबरोबरच कर्ली खाडीपात्राचे पाणीही गावात घुसले. याची माहिती मिळताच माजी खासदार नीलेश राणे यांनी देवबाग गावास भेट देत पाहणी केली. यावेळी स्वाभीमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, संतोष लुडबे, मोहन कुबल यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मुसळधार पावसाबरोबरच समुद्राला आलेल्या उधाणाचा जोरदार तडाखा देवबाग गावास बसला. हायटाईडमुळे समुद्राच्या उंच लाटा बंधार्‍यावरून वस्तीत घुसले. लाटांच्या पाण्याबरोबरच कर्ली खाडीचे पाणीही वस्तीत घुसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण होते. उधाणाचा मोठा फटका ख्रिश्‍चनवाडी, मोबारवाडीस बसला. यात समुद्री अतिक्रमणात मोबारवाडीची २५० गुंठे जमीन समुद्राने गिळंकृत केल्याचे दिसून आले. या भागास श्री. राणे यांनी भेट देत पाहणी केली.
दरवर्षी पावसाळ्यात देवबाग गावास सागरी अतिक्रमणाचा फटका बसत आहे असे असतानाही गेल्या पाच वर्षात सत्ताधार्‍यांनी येथे संरक्षक बंधारा न बांधल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. समुद्री लाटांचे पाणी वस्तीत घुसू लागल्याने संपूर्ण गावच वाहून जाण्याची भीती यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या पार्श्‍वभूमीवर श्री. राणे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत चर्चा केली. समुद्री अतिक्रमणामुळे देवबाग गावास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देवबाग गावास भेट देऊन तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या.

17

4