आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे झाली नियुक्ती ; हरी खोबरेकर यांची माहिती…
मालवण, ता. ३ : मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयालक्ष्मी शानबाग यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज आरोग्य उपसंचालकांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. विजयालक्ष्मी शानबाग या काही दिवसांपूर्वी हजर झाल्या होत्या. त्यांची नियुक्ती ही वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आली होती. कोल्हापूर आरोग्य सेवा उपसंचालकांकडून त्यांना नियुक्तीचे आदेश नसल्याने त्यांच्या नियुक्तीवरून गोंधळ निर्माण झाला होता. याबाबत पंचायत समितीच्या मासिक सभेतही सदस्यांनी याची सखोल चौकशीची मागणी केली होती. यावर आरोग्य उपसंचालकांकडून त्यांच्या नियुक्तीवरील कार्यवाही सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकार्यांनी दिली होती.
डॉ. शानबाग यांच्या नियुक्तीवरून झालेल्या गोंधळाबाबत आमदार वैभव नाईक यांनी आरोग्य उपसंचालकांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर आज त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. नियुक्तीच्या आदेशात डॉ. शानबाग यांची नियुक्ती एक वर्ष कालावधीसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नियुक्तीचे आदेश मिळाल्याने डॉ. शानबाग अधिकृतरित्या हजर होणार आहेत.