बांदयाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार : दीपक केसरकर

252
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.३ : बांदा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशव्दार आहे. त्यामुळे पर्यटनाच्या नकाशावर येण्यासाठी येथील ऐतिहासिक रेडे घुमट, डच किल्ला या वास्तूंचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास करण्यात येणार आहे. पर्यटकांचा ओघ वाढवा यासाठी येथील पोलीस स्थानक शहरात स्थलांतरित करण्यात येणार असून किल्ला हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग-गोवा प्रवेशद्वारावर दीड कोटी रुपये खर्चून पर्यटक स्वागत केंद्र उभारण्यात येणार असून येत्या स्वातंत्रदिनी या केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी आकर्षक पद्धतीने माहिती फलक लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली. शहरातील अत्याधुनिक सीमा तपासणी नाका व अन्य प्रस्तावित विकासकामांचा आढावा आज पालकमंत्री केसरकर यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुशांत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, उपनिरीक्षक उमाकांत पालव, सरपंच मंदार कल्याणकर, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, साईप्रसाद कल्याणकर, अर्चना पांगम, सुशांत पांगम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केसरकर यांनी सीमा तपासणी नाका, प्रवेशद्वारावरील पर्यटन केंद्र, रेडे घुमट, पोलीस स्थानकातील किल्ला, निमजगा येथील प्रस्तावित क्रीडा संकुल आदींची पाहणी केली. व विकासकामांची तातडीने पूर्तता करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

\