पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक ठप्प; वाहतूक फोंडामार्गे वळविली
वैभववाडी/पंकज मोरे ; कोकणात गेल्या आठ दिवसापासून पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. रविवारी सकाळी मुसळधार सुरू झालेल्या पावसाने गगनबावडा तालुक्यातील मांडुकली किरवे दरम्यान पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडामार्गे वळविण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसापासून कोकणात धो-धो पाऊस कोसळत आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात रविवारी पहाटेपासूनच पावसाने हाहाकार माजवल्याने तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली-किरवे(ता. गगनबावडा) याठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. मालवाहतूक करणाऱ्या गाड्या गगनबावडा येथे थांबविण्यात आल्या आहेत. तर एस. टी. बसेस फोंडा मार्गे वळविण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा मार्ग पाण्याखालीच राहणार आहे.