दीपक केसरकर: यापुढचा विकास कामांचा निधी एमटीडीसी ऐवजी सावंतवाडी पालिकेकडे देणार
सावंतवाडी, ता,४ : येथे उभारण्यात येणाऱ्या मोनोरेलचे काम आठवड्याभरात सुरू करण्यात येणार आहे. मोती तलावाच्या काठावर होणारा हा प्रकल्प आता शिवउद्यानात ५०० मीटर जागेत उभारण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री व राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान मोनोरेलचे टेंडर झाले आहे त्यामुळे हे सोडुन यापुढची सर्व कामे पालिकेच्या माध्यमातून करण्यात येतील असे आश्वासन केसरकर यांनी दिले व अप्रत्यक्षरित्या नगराध्यक्ष बबन साळगावकर व आपल्यात निर्माण झालेल्या तिढा त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला.
सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर उभारण्यात येणारी मोनोरेल आता शिव उद्यानात उभारण्यात येणार आहे. दोन किलोमीटर ऐवजी पाचशे ते आठशे मीटर ही मोनोरेल असणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. या प्रकल्पासाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील काही रक्कम उरणार आहे. उद्यानात मोनोरेल उभारताना कोणती झाडे तोडली जाणार नाहीत तर आहे त्या परिस्थितीत सिमेंटचे खांब उभे करून पंधरा फूट उंच मनोरे उभारण्यात येणार आहे.
येत्या १५ ऑगस्टला या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे असे केसरकर म्हणाले यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे,तानाजी पालव, शिवप्रसाद कुडपकर, एमटीडीसीचे अधिकारी केदार काटकर आदी उपस्थित होते.