येत्या निवडणुकीपूर्वी लेझर शो, लाईट अँड साऊंड शो च्या कामांना सुरवात करणार…

146
2

प्रमोद जठार ; येत्या आठ दिवसात जागा निश्चतीसाठी पथक येणार…

मालवण, ता. ४ : किल्ले सिंधुदुर्गच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी ६२ कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र पुरातत्त्व विभागाने काही आक्षेप घेतला. त्यामुळे राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या १० कोटी रुपयांच्या निधीतून पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असलेले क्षेत्र वगळता किनारपट्टीच्या दिशेने येत्या निवडणुकीपूर्वी लेझर शो, लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो आदी कामे सुरू केली जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर येत्या आठ दहा दिवसात जागा निश्‍चितीसाठी डिझायनर, पर्यटन विभागाचे अधिकारी येथे येणार आहेत. अशी माहिती पर्यटन संचालनालयाच्या कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती गणेश कुशे, समीर गावडे, ओेंकार बांदकर, संदीप बांदिवडेकर आदी उपस्थित होते.
श्री. जठार म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी अर्थमंत्री मुनगंट्टीवार यांनी ६२ कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे सादर केला होता. मात्र पुरातत्त्व विभागाने त्यात काही आक्षेप घेतल्याने तो प्रस्ताव मागे आला. त्यामुळे राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या १० कोटी रुपयांच्या निधीतून पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत नसलेल्या भागातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येथील बंदर जेटी परिसरात लेझर शो, लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो या कामांचा येत्या निवडणुकीपूर्वी श्री गणेशा करायचा आहे. यासाठी आवश्यक जागांची निश्‍चिती करण्यासाठी डिझायनर, पर्यटन विभागाचे अधिकारी येत्या आठ दिवसात येथे येणार आहे.
पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागात मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नवे प्रकल्प आणण्याचे काम पर्यटन संचालनालयाकडून केले जाणार आहेत. यात जिल्ह्यातील सी-वर्ल्ड प्रकल्प पूर्णत्वास कसा नेला जाईल, चांदा ते बांदा योजनेतंर्गतचे प्रकल्प, स्वदेश दर्शनमधील प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. येत्या पाच वर्षाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पर्यटनात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

4