पायलट प्रकल्प म्हणून सिंधुदुर्गची निवड ; १०० गावांची निवड होणार…
मालवण, ता. ४ : देशातील पर्यटन प्रकल्पांचा प्रचार, प्रसारासाठी शासनाने एअर बीएनबी या अमेरिकेच्या कंपनीसोबत करार केला आहे. या कंपनीच्या माध्यमातून येथील पर्यटनाचे ब्रॅण्डींग केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत पायलट प्रकल्प म्हणून जिल्ह्याची निवड केली आहे. यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या १०० गावांची निवड केली जाणार आहे. या १०० गावांमध्ये प्रत्येकी पाच अशी ५०० होमस्टेची निर्मिती केली जाणार असून यासाठी एक पथक जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल होणार आहे अशी माहिती कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्र्यांनी कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदाची संधी दिल्यानंतर प्रथमच येथे भेट दिली आहे. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून खर्या अर्थाने कोकणातील पर्यटन विकासासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. या समितीच्या उपाध्यक्ष पदाचा कालावधी आगामी पाच वर्षांसाठी असून या कालावधीत जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा चेहरामोहरा बदलण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठीच येथील पर्यटनाच्या प्रचार, प्रसारासाठी एअर बीएनबी या अमेरिकन कंपनीची निवड केली आहे. शासनाने या कंपनीबरोबर करार केला असून या कंपनीमार्फत १०० गावात होमस्टे निर्माण केले जाणार असून त्याचे जागतिक पातळीवर मार्केटिंग कंपनीच्या माध्यमातून होणार आहे असे श्री. जठार यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गातील विविध सण, जत्रा यांचा प्रसारही या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार असून येथील गणेश चतुर्थी कशी असते, येथील होळी, दिवाळीचा सण कसा असतो? हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे आकर्षित होतील. यंदाच्या गणेशोत्सवाचे या दृष्टीने मार्केटिंग करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून जगाचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळविण्यावर आपला भर असेल असे त्यांनी स्पष्ट केले.