खोत जुवा बेटास पुराच्या पाण्याचा वेढा…

274
2

मालवण, ता. ४ : मालवण शहरासह तालुक्यास आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. समुद्री उधाणाचा जोर आजच्या तिसर्‍या दिवशीही कायम राहिल्याने त्याचा फटका देवबाग, दांडी किनारपट्टी भागास बसला. किनारपट्टी भागाबरोबरच सागरी उधाणामुळे कालावल खाडीपात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने मसुरेतील खोत जुवा बेटास पाण्याने वेढा घातला. शिवाय खाडीपात्राचे पाणी बेटावर घुसल्याने घरांसह माडबागायतींना धोका निर्माण झाला आहे. चहूबाजूने पाणी बेटावर घुसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
गेले काही दिवस संततधार पडणार्‍या पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला असून रात्री उशिरापर्यंत पावसाचा कायम आहे. समुद्री उधाणामुळे समुद्राच्या अजस्र लाटांचा मारा किनारपट्टीस बसत असून आजच्या तिसऱ्या दिवशीही देवबाग किनारपट्टीला समुद्राच्या लाटांचा जबरदस्त तडाखा बसला. उधाणाचे पाणी आजही वस्तीत घुसले होते. देवबागवासियांवर मोठे संकट ओढवले असताना प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देत तत्काळ आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे होते. मात्र त्यावरील कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. देवबाग किनारपट्टीसह दांडी येथील किनारपट्टीस उधाणामुळे समुद्री लाटांचा तडाखा बसला. पाच वर्षापूर्वी दांडी किनार्‍यालगत काही ठिकाणी घातलेल्या बंधार्‍यामुळे दांडेश्‍वर, चौकचार या दोन मंदिराचा धोका टळला आहे.
किनारपट्टी भागाबरोबरच मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. खाडीपात्रेही तुडुंब भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. कालावल खाडीपात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मसुरेतील खोत जुवा बेटास चहूबाजूने पाण्याने वेढा घातला आहे. खाडीपात्रातील पाणी थेट बेटावर घुसल्याने तेथील घरांना तसेच माडबागायतीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बेटास धोका पोहचू नये यासाठी शासनाकडे गेली काही वर्षे संरक्षक बंधार्‍याची मागणी केली जात आहे. मात्र त्यावरील कार्यवाही अद्याप न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

4