फ्रेंडशिप डे च्या दिवशी केसरकर साळगावकरांचे “पॅचअप”…?

284
2
Google search engine
Google search engine
Google search engine

गुरूकुल मध्ये गुप्त चर्चा: दोघांची भूमिका काय याकडे मतदारसंघाचे लक्ष

सावंतवाडी/अमोल टेंबकर, ता.५ :
गेले काही दिवस राजकीय आखाड्यात टीका टिपणी झाल्यामुळे दुरावलेले पालकमंत्री दीपक केसरकर व नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची काल फ्रेंडशिप डेच्या दिवशी रात्री उशिरा अखेर “भेट” झाली.या भेटीबाबत वृत्तान्त कळू शकला नाही. मात्र आता हे दोन मित्र पुन्हा एकत्र येणार की तिढा कायम राहणार हे मात्र प्रश्नचिन्ह आहे.
नगराध्यक्ष बबन साळगावकर व केसरकर हे दोघे राजकारण आणि समाजकारणात अत्यंत जवळचे मित्र मानले जातात. केसरकर राजकारणात यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी साळगावकरांनी साथ दिली.त्यामुळे दोघांनाही राजकारणात फायदा झाला.
श्री साळगावकर हे आज केसरकर यांच्या पाठिंब्यामुळे नगराध्यक्ष आहेत. मात्र गेले काही दिवस त्यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. पालिकेला निधी न देता थेट तो एमटीडीसी कडे वर्ग केला तसेच सावंतवाडी पालिकेला मिळाले स्वच्छता अभियान चे बक्षीस वेळेत दिले नाही अशा विविध कारणावरून या दोघात हे शीतयुद्ध रंगले होते. यावरून साळगावकर यांनी केसरकरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रथम आक्रमक विधानानंतर साळगावकर हे माझे गुरुबंधू आहेत असे सांगून श्री केसरकर यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या दोघातील दरी वाढणार की कमी होणार असे प्रश्नचिन्ह होते.
मात्र काल सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री केसरकर यांनी ऐन फ्रेंडशिप डेच्या दिवशी अचानक नगराध्यक्ष साळगावकर यांची गुरुकुल येथे जाऊन भेट घेतली.
यावेळी दोघात नेमकी काय चर्चा झाली याचा वृत्तांत समजू शकला नाही. मात्र या गुप्त चर्चेचा परिणाम काय होईल हे थोड्या दिवसांनी समजणार आहे.पालकमंत्री केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर साळगावकर यांनी आपण विधानसभा लढवणार आहे असे जाहीर केले आहे. तसेच त्यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमदार नितेश राणे भेटले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर आता साळगावकर केसरकर यांच्या भेटीनंतर कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

\