अर्चना घारेंकडे खुद्द पवारांनीच सावंतवाडीची जबाबदारी दिली…

2

प्रविण भोसले: आगामी काळात त्यांना नक्कीच सहकार्य करणार

सावंतवाडी, ता. ५ : येथील विधानसभा मतदार संघाची जबाबदारी अर्चना घारे परब यांच्यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोपवली आहे, तसेच त्यांना सहकार्य करण्याची सुचना मला केल्याने पक्ष संघटना वाढीसाठी भविष्यात लागेल ती मदत घारें-परब यांना केली जाईल अशी ग्वाही माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी येथे दिली.
सावंतवाडी नगरापालिका बॅ नाथ पै सभागृहात संसद रत्न खास सुप्रिया सुळे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्चना फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.यावेळी व्यासपिठावर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड दिगंबर गावकर, अ‍ॅड.दिलीप नार्वेकर,अ‍ॅड वर्षा गावकर, अर्चना परब-घारे,राष्ट्रवादी व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी,संदिप घारे,संरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, सुनिल परब, कुब्रल सरपंच प्रविण परब,संदिप राणे, निलेश मेस्त्री,मंकरद परब, कृष्णा राऊळ आदी उपस्थित होते.
भोसले म्हणाले, सावंतवाडी सारख्या शहरात मध्यमवर्गीय कुंटूबात वाढलेल्या अर्चना घारे यांनी पुणे येथील इंजिनियरिग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, संदिप घारे यांच्याशी लग्न झाल्यानंतर मावळ सारख्या मोठ्या गावाचे त्यांनी सरपंच पद सांभाळले, आज आमदार होणे सोडाच पण सरपंच होणे त्यापेक्षाही कठिण झाले असतांना घारे सरपंच दोनवेळा सरपंच झाल्या.यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो असे म्हटले जाते मात्र अर्चना घारे यांच्या बाबतीत वेगळे असुन तिच्या मागे संदिप घारे यांची भक्कम अशी साथ राहीली आहे.
पुणे मध्यवर्ती जिल्हाबॅकेच्या उपाध्यक्ष असलेल्या सौ घारे परब यांच्यावर येथील राष्ट्रवादीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पवार यांचे नेहमी या मतदार संघावर प्रेम राहीले आहे, त्यामुळे येथील पक्षसंघटना वाढीबरोबर पवार यांनी मला केलेली सुचना लक्षात घेता घारे यांनी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.
अ‍ॅड. नार्वेकर म्हणाले, घारे यांनी याठिकाणी राबविलेला भजनाची स्पर्धा येथील तरूणपिढीला दिशादर्शक आहे, भपिष्यात आरोग्यावर आधारित शिबीरे घारे यांनी याठिकाणी घ्यावीत भाईसाहेब सावंत आयुर्वेंदिक कॉलेजच्या माध्यमातून सर्वमदत केली जाईल असे आश्‍वासन दिले.
तर घारे- परब म्हणाल्या, भजन आणि जीवन एकमेकांना जोडले आहे.भजनामुळे शारिरिक स्वास्थ मिळते, संत साहीत्य आजच्या पिढीला दिशादर्शक आहे, याठिकाणी युवा पिढी भजन कला जोपासत असतांना महलावर्गही या क्षेत्रात मागे नाही हे पाहून अभिमान वाटत आहे. गेले महीनाभर या भजन स्पर्धेच्या माध्यमातून काम करतांना खुप अनुभव आले, सर्वाचे सहकार्याने हि स्पर्धा यशास्वी पार पाडू शकले, त्यामुळे भविष्यातही याठिकाणी अधिक चांगले कार्यक्रम राबवू असे आश्‍वासन देत ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षतरित्या सहकार्य केले त्या सर्वाचे आभारही त्यांनी व्यक्त केले.

5

4