‘ते’ कार्यकर्ते लवकरच स्वगृही परततील ; लोकसभा निवडणुकीत शहरातील मताधिक्य घटल्याने आमदार वैफल्यग्रस्त…
मालवण, ता. ५ : मेकर हा किंग तयार करत असतो त्यामुळे किंग हा तेवढ्यापुरताच तर मेकर हा चिरंतन काळापर्यंत टिकून राहतो. आतापर्यंत अनेक किंग उदयास आणले असून ते तयार करण्याची ताकद माझ्यात आहे. एक किंग गेला तरी अनेक किंग माझ्यासाठी जिवास जीव देण्यास सज्ज आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शहरात अडीच हजाराचे मताधिक्य स्वाभीमानला मिळाल्याने माझ्या ध्यास घेतलेले आमदार वैफल्यग्रस्त बनले आहेत. अशी घणाघाती टीका माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी येथे केली.
मेढ्यातील काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले ते गैरसमजुतीने, काही फसवणुकीने तर काही मनापासून गेलेले नाहीत. शंकर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राजकारण करून लोकांची फसवणूक करून त्यांना शिवसेना शाखेत बोलाविण्यात आले. शंकराचे मंदिर आमच्यासाठी श्रद्धास्थान असून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपले सहकार्य राहिले असून यापुढेही राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते लवकरच स्वगृही परततील असा विश्वासही श्री. आचरेकर यांनी व्यक्त केला.
शंकर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार दहा लाख रुपयांची देणगी देणार असल्याची माहिती मिळाल्याने तसेच प्रभागातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी मेढ्यातील नागरिकांना शाखेत बोलविण्यात आले होते. यात जे निवेदन देण्यात आले त्या निवेदनावर स्वाक्षर्या केलेले अनेक नागरिक अनुपस्थित होते. शिवाय काही जणांनीच शिवबंधन बांधले तर काहीजण शिवबंधन बांधून न घेताच माघारी परतले. आमदारांकडून कोणतीही देणगी न मिळाल्याने त्यांनी नागरिकांची घोर फसवणूक केली आहे.
शहरातील जनतेने मालवणचे किंगमेकर ही उपमा वडील कै. सुबोध आचरेकर यांना बहाल केली होती. त्यांनी ती ३० वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत सिद्धही करून दाखविली. त्यांच्या निधनानंतर मी १९९५ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तब्बल २४ वर्षे म्हणजेच सहा टर्म मालवण नगरपालिकेच्या राजकारणात अनभिषिक्त साम्राज्य केले. म्हणूनच वारसा हक्काने किंगमेकर ही उपमा मला जनतेने दिली. जनतेने मला, कुटुंबाला आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम दिले आणि ते प्रेम यापुढेही राहील. असे आचरेकर यांनी सांगितले.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील शहरातील मताधिक्य यावेळच्या लोकसभा निवडणुकीत घटल्याने आमदार वैभव नाईक यांना पोटशूळ उठणे साहजिकच आहे. मताधिक्य घटल्याने आमदारांना नैराश्य आले असून ते वैफल्यग्रस्त बनले असून त्यांना आपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे या नैराश्यापोटीच त्यांनी किंगमेकर मधील किंग आपल्यात आला असे सांगून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. मात्र गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात, सामाजीक क्षेत्रात काम करताना अनेक किंग तयार केले. त्यामुळे एक किंग गेला तरी असे माझे अनेक किंग आजही माझ्यासाठी जिवास जीव देण्यासही तयार आहेत हे आमदारांनी ध्यानात ठेवावे.
शहरात अनेक समस्या असताना आमदार त्यावर काहीही बोलत नाहीत. शहर विकास आराखडा तसाच ठेवून तो मालवणवासियांच्या माथी मारण्याचे काम आमदारांनी केले आहे. परिणामी या शहर विकास आराखड्यामुळे शहरवासीय उद्ध्वस्त होणार आहेत. सीव्हीसीएचा प्रश्न, कोळंब पूल, रस्त्याच्या कामातही भ्रष्टाचार झाला आहे या सर्वाचा पोलखोल लवकरच करू असा इशाराही आचरेकर यांनी यावेळी दिला.