ओठवणे,ता.५ : इन्सुली येथील वीज वितरणच्या उपकेंद्रात मोठा बिघाड झाल्याने २० पेक्षा गावांची बत्ती गुल झाली आहे.या उपकेंद्रातुन वीज पुरवठा होणारी अनेक गावांमधील वीज पुरवठा गेले ३ ते ५ दिवस वारंवार खंडित होत असून,ग्रामस्थांच्या तक्रारींना वीज वितरणचे अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहे.वीज वितरणच्या कारभाराबाबत ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
गेले ३ ते ४ दिवस तालुक्यात तुफान पाऊस कोसळत आहे.वादळी वाऱ्याचाही मोठा प्रभाव असून,वीज वितरणच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे.तालुक्यातील ओटवणे दशक्रोशी,बांदा परिसर,लगतच्या दोडामार्ग परिसरातील अनेक गावांमधील वीज पुरवठा गेले ४ दिवस वारंवार खंडित होत आहे.तालुक्यातील अनेक गावांना वीज पुरवठा करणाऱ्या इन्सुली येथील सब स्टेशन मध्ये मोठा बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याची माहिती वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. वीज पुरवठा कधी सुरळीत होणार याची नेमकी माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत.काही ग्रामस्थांनी वीज वितरणकडे याबाबत विचारणा केली असता,बांदा येथील अधिकाऱ्यांनी चक्क दोन दिवस वीज येणार नाही असे सांगितले.
इन्सुली उपकेंद्रासोबतच ओटवणे,विलवडे आधी भागातील वीज वाहिन्यात बिघाड झाला असून,मुसळधार पाऊस व पाणी भरल्याने काम करण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे कारण वितरणचे कर्मचारी पुढे करत आहेत.दरम्यान, मुसळधार पाऊस व त्यात गेले काही दिवस सतत खंडित होणार वीज पुरवठा यामुळे, तालुक्यातील सहयाद्री पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असून ग्रामीण भागात गणेश मूर्तीच्या कामांना वेग आला आहे.मात्र वीजच गायब होत असल्याने,मूर्तीकारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.