पर्जन्यवृष्टीचा कहर… बांदा इन्सुलीत पाणीच पाणी

1244
2
Google search engine
Google search engine

बांदा ता 6
बांदा शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीला पूर आला. तेरेखोल नदीचे पाणी शहरातील आळवाडी बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. शहरातील आळवाडी-कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला आहे. कट्टा कॉर्नर येथील भंगार आळी, लमाणी वस्तीत तसेच निमजगा येथील लक्ष्मी-विष्णू या रहिवासी इमारतीचा तळमजला पाण्याखाली गेल्याने राहिवाश्यांची तारांबळ उडाली. तर इन्सुली परिसरातील काही घरात पाणी शिरले आहे. परिसरातील छोटया पुलांवर पाणी आल्याने या गावांचा बांदा शहराशी संपर्क तुटला आहे. बांदा शहरात पुराचे पाणी शिरूनही आपत्ती व्यवस्थापनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील आळवाडी येथील दुकाने व घरात पुराचे पाणी शिरले आहे. शहरातील वीज पुरवठा काल रात्रीपासून खंडित आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने बाजारपेठेतील पुराच्या पाण्यामध्ये वाढ होत आहे. या ठिकाणी असलेल्या भाजी विक्रेत्यांची भाजी देखील वाहून गेली आहे. मच्छी मार्केट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत होती. पावसाचा जोर काल दुपारनंतर वाढल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा आळवाडी परिसरात शिरले. आळवाडी येथील दुकानात पुराचे पाणी घुसले. येथील ग्रामपंचायतिच्या उद्यानात पाणी शिरल्याने उद्यानाचे नुकसान झाले.
निमजगा येथील लक्ष्मी-विष्णू या निवासी इमारतीचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवासी इमारतीत अडकून पडलेत. तेथिलच भंगार आळीत व लमाणी वस्तीत पाणी शिरल्याने कामगारांच्या झोपड्या वाहून गेल्यात. यामध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेर्ले येथील जुने कापई पूल, मडुरा येथील माऊली मंदिर समोरील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इन्सुलि येथे सावंतवाडी-बांदा रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. इन्सुलि येथील कर्म रोपवाटिकेत पाणी शिरल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेर्ले कापई परिसरात भातशेतीत पाणी शिरल्याने शेती वाहून गेली. येथील घरात देखील पाणी शिरले आहे. बांदा शहर व परिसर जलमय झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.