लोरे येथील शिवगंगा नदीला महापूर
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
देवघर धरणातून ४५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग
वैभववाडी उंबर्डे मार्ग ठप्प
वैभववाडी/पंकज मोरे,ता.६ : तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून वाहतूक ठप्प झाली आहे. तर देवधर प्रकल्पात पाण्याची पातळी वाढल्याने ४५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यात आठ दिवसापासून धो-धो पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
लोरे येथील शिवगंगा, करूळ येथील सुकनदीला महापूर आल्याने फोंडा-वैभववाडी व वैभववाडी उंबर्डे मार्ग ठप्प झाला आहे. तर एडगाव पवारवाडी येथील कॉजवेवर पाणी व फौजदारवाडी येथील रस्त्यावर दरड कोसळल्याने या वाडीचा संपर्क तुटला आहे. मंगळवारी मध्यरात्री पासून वादळी वा-यासह वरुण राजाने जोरदार बॕटींग केली आहे. सोनाळी येथे रस्त्यावर पाणी आल्याने उंबर्डे वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
भुईबावडा घाणेगडवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेला आहे. तर ऐनारी येथील स्मशानभूमी नजिकचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. बहुतांशी ठिकाणी शेतीत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. पूरस्थिती असल्याने एसटी वाहतूकही कोलमडली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मंगळवारी तालुक्यातील बहुतांशी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.