विजयदुर्ग पोलिस अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप
सिंधुदुर्गनगरी.ता,६: आपण बांधलेली इमारत काहीही अधिकार नसताना एका व्यक्तिने ९ मे रोजी पाडली. याबाबत विजयदुर्ग पोलिस ठाण्यात त्याच दिवशी तक्रार अर्ज केलेला असताना दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. विजयदुर्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यास अनेकवेळा या पोलिस ठाण्यात गेलो असताना सबंधित अधिकाऱ्याने भेट दिली नाही. या अन्याया विरोधात वाचा फोडण्यासाठी तसेच नुकसान करणाऱ्या व्यक्तीला शासन घडण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा देवगड तालुक्यातील बांदे येथील शंकर हरी पोसम यांनी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांना मंगळवारी निवेदनाद्वारे दिला आहे.
शंकर पोसम यांनी निवेदनात २०१० साली आपण गावी आल्यावर गंगाधर म्हादनाक यांची वहिवाट असलेली जागा खरेदी केली. त्या ठिकाणी त्यांच्या मालकीची कुड होती. त्याच ठिकाणी आपण इमारत बांधकाम केले. त्यानंतर बांधकामाचा ठेका न दिल्याच्या रागातून अजय गांवकर या व्यक्तिने सहहिस्सेदार असलेल्या एका व्यक्तीला देवगड दीवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली. तो निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर मी खरेदी केलेला भूकंड व बांधलेली इमारत सर्व्हे नं बदलला असल्याचे लक्षात आल्याने सबंधित जमीन मालक व आपण याची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, अजय गांवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेसीबी लावत इमारत पाडली. याच व्यक्तिने काही गावकारी व्यक्तींना हाताशी धरत गेली पाच वर्षे आपल्या घरावर बहिष्कार घातला आहे. कोणत्याही सणाला गावकारी येत नाहीत. याबाबत विजयदुर्ग पोलिस अधिकारी हे तक्रार देवूनही दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना भेटण्यासाठी गेलो तरी ते भेट देत नाहीत. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आपण १५ ऑगस्टला उपोषणाला बसणार असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.