Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात पावसाने हाहाकार...!

सिंधुदुर्गात पावसाने हाहाकार…!

जिल्हाधिकारी पांढरपट्टे;तिघेजण वाहून गेले,एकाचा मृतदेह मिळाला,मात्र जिल्ह्यात गंभीरस्थिती नाही…

सिंधुदुर्गनगरी ता.०६: जिल्ह्यात पावसाने थैमान घालत आपली दहशद कायम ठेवली असून सोसाट्याचा वारा आणि जोरदार पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने गावा गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने अनेकांचा संपर्क तुटला आहे. तर महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. एकाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले आहेत. इन्सूली, आवरडे, मणेरी, कुडाळ आदि भागातील काहींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तिलारी धरण पुर्ण भरले असून ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राष्ट्रिय आपत्ती प्रतीसाद दलाला जिल्ह्यात बोलविण्यात आले आहे. ३० जणांचा समावेश असलेली ही टीम आज संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकशाही दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाली आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार पासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसाचा जोर आजही कायम असून सोसाट्याच्या वाराही सुटला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पुर आल्याने पुराचे पाणी रस्त्यावर, शेतीत, बाजारपेठा आणि घरांमध्ये घुसले आहे. गावांना जोडणारी पुले पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कुडाळ, पावशी वागदे येथे पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सोसाटयाच्या वाऱ्यामुळे झाडे विद्युत खांबांवर पडल्याने अनेक ठिकाणचा विद्युत् पुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती असली तरी कोठेही गंभीरस्थिती निर्माण झाली नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ पांढरपट्टे यांनी स्पष्ट केले. तसेच खबरदारी म्हणून जिल्ह्याची सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे. असेही त्यांनी सांगितले.

एनडीआरएफचे पथक बोलविले
जिल्ह्यात सद्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे पुर्ण भरली आहेत. तिलारी धरण पुर्ण भरले आहे. धरणातील पाणी मोठ्या विसर्गाने सोडण्यात आले आहे. तरीही या धरनाचे पाणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतीसाद दलाचे पथकाला पाचारण करण्यात आली आहे. ३० जणांचा समावेश असलेली ही टीम आज संध्याकाळी जिल्ह्यात दाखल होणार आहे. ही टीम तिलारी भागात राहणार असून आवश्यकता भासल्यास तीचा जिल्ह्यात अन्यत्र वापर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.

22 हून अधिकांना सुरक्षित स्थळी हलविले
मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. पाणी भरलेल्या ठिकाणी असलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे कार्य सुरु आहे. इन्सूली बिलेवाडी येथील १२ जणांना, कुडाळ लक्ष्मीवाडी येथील ५ जणांना, दोडामार्ग आवर्डे येथील ५ जणांना आणि मनेरी येथील लोकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पुराच्या पाण्यात एकाचा मृत्यू तर दोघे बेपत्ता
मुसळधार पावसामुळे जिल्हा पुरग्रस्त बनला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. या पुराच्या पाण्यात कणकवली तालुक्यातील सांगवे गावातील मनोहर रामचंद्र कांबळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे. तर उम्बर्डे येथील महेंद्र कदम आणि मळेवाड येथील भाग्यश्री पिळणकर हे दोघे बेपत्ता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

तिन्ही घाटमार्ग बंद : आंबोलीत दरड कोसळली
जिल्ह्यासह कोल्हापुर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि त्याठिकाणीही पाणी भरल्याने गगणबावडा घाट, फोंडा घाट आणि आंबोली घाटमार्ग बंद आहेत. या मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद झालेली आहे. तर आंबोली घाटात दरडही कोसळली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments