वाहनांच्या लांबच लांब रांगा:आंबोली रस्ता आज सुरू होणे अशक्यच…
सावंतवाडी.ता,६:
आंबोली घाटात दरड कोसळलेली याठिकाणी असलेली माती बाजूला करण्यास प्रशासनाला यश आले. परंतु तो मातीचा ढिगारा बाजूला होतो न होतो तोच पुन्हा भलामोठा दरडीचा भाग त्याठिकाणी कोसळला आहे. त्यामुळे आजच्या दिवसात सावंतवाडी आंबोली मार्ग सुरू होणे अशक्य आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान त्या ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकलेल्या सावंतवाडीचे युवा कार्यकर्ते अमेय प्रभू-तेंडोलकर यांनी याला दुजोरा दिला आहे.
त्यांनी सांगितल्यानुसार पहाटेपासून झाडे व दरडी कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी दाखल झालेल्या प्रशासनाच्या जेसीबी च्या माध्यमातून कोसळलेल्या दरडीचा भाग बाजूला काढण्याचा प्रयत्न आला. त्याला यश आले परंतु त्याला काही वेळ होतो न होतो तोच पुन्हा भलामोठा दरडीचा भाग त्या ठिकाणी कोसळला आहे. सद्यस्थिती लक्षात घेता. त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.