तळाशील वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी घेतला निर्णय ; प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाबाबत तीव्र संताप…
मालवण, ता. ६ : सागरी उधाणाचा जोर कायम राहिल्याने तळाशीलमध्ये समुद्राबरोबरच कालावल खाडीचे पाणी भरले आहे. त्यामुळे तळाशीलला बुडण्यापासून वाचविण्यासाठी प्रशासनाची वाट न बघता ग्रामस्थांनी एकत्रित येत जीव धोक्यात घालत समुद्राच्या नस्ताचा वाळूने भरलेला भाग कालावल खाडीच्या पुराचे पाणी जाण्यासाठी मोकळा केला. यामुळे तळाशीलसह बांदिवडे, खोत जुवा, मसुरे, चिंदर गावातील गडनदीकिनारी पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या गावांना फायदा होणार आहे.
सागरी उधाणाचा आणि मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने तळाशीलसह आचरा, चिंदर या गावांना पुराचा फटका बसला आहे. एका बाजूने समुद्री लाटांचा मारा होत असताना दुसर्या बाजूने कालावल खाडीने धोक्याची पातळी गाठल्याने तळाशील वस्तीत पाणी घुसले आहे. तळाशील येथील कृष्णमंदिर व लगतची घरे खाडीच्या पाण्याने वेढली आहेत. परिणामी गावाला धोका निर्माण होऊन ते बुडत असल्याने प्रशासन, राज्यकर्त्यांची वाट न पाहता तळाशीलच्या ग्रामस्थांनी कृष्णमंदिरात एकत्र येत समुद्र आणि खाडीला जोडणार्या नस्ताचा भाग मोकळा करण्याचा निर्णय घेतला.
प्रत्येक ग्रामस्थ हातात फावडे घेऊन नस्ताच्या ठिकाणी दाखल झाले. सकाळी दहा वाजल्यापासून नस्ताचा गाळाने भरलेला भाग खाडीत उतरून मोकळा करण्यात आला. पुराच्या पाण्यात तीन तास राहून नस्ताचा भाग ग्रामस्थांनी मोकळा केला. समुद्री लाटांच्या मार्याबरोबरच खाडीपात्रांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने तळाशील ग्रामस्थांवर दुहेरी संकट कोसळले आहे. प्रत्येक ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असताना त्याची दखल प्रशासनाने, आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी न घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आचरा पारवाडीत भातशेती व घरापर्यंत खाडीपात्राचे पाणी घुसले. आचरा हिर्लेवाडीत उधाणामुळे काही भाग समुद्राने गिळंकृत केला. यामुळे सुरुची बरीच झाडे समुद्रात वाहून गेली. चिंदर लब्देवाडीत कालावल खाडीच्या पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे तेथील २१ घरांना धोका निर्माण झाला होता.