खोत जुवा बेटावरील २८ घरांना पुराच्या पाण्याचा वेढा… आपत्कालीन यंत्रणा सुशेगाद ; किनारपट्टीस उधाणाचा फटका…

198
2

मालवण, ता. ६ : गेले सहा दिवस पडणार्‍या मुसळधार पावसाने आजच्या दिवशीही शहरासह तालुक्यास झोडपले. समुद्री उधाणाचा फटका देवबाग, दांडी, तळाशिल, तोंडवळी गावांना बसला आहे. नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने त्याचा फटका मसुरेतील खोत जुवा तसेच लगतच्या बेटांना बसला आहे. खोत जुवा बेटावरील सुमारे २८ घरांना पाण्याने वेढा घातला असून ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन यंत्रणेशी स्थानिक ग्रामस्थांनी संपर्क साधून याची माहिती दिली आहे. मात्र संबंधित यंत्रणेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पावसाने कहर केला असून नद्या, नाल्यांना पूर आला आहे. कालावल खाडीपात्राने धोक्याची पातळी गाठल्याने हे पाणी मसुरेतील खोत जुवा बेटावर घुसले आहे. कालच्या दिवशी पाणी घुसल्याने घरांसह माडबागायतीस धोका निर्माण झाला होता. रात्री खाडीच्या पुराचे पाणी थेट घरापर्यंत पोचले. बेटावरील २८ घरांना सद्यःस्थितीत पाण्याने वेढा घातला असून स्थानिक ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. चहूबाजूने पाण्याचा वेढा बसला असून काही घरांमध्ये पाणीही घुसले आहे. त्यामुळे अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आज सकाळीच आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधत निर्माण झालेल्या धोक्याची माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून उशिरापर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पाण्याने घरांना वेढा दिला असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या होड्या सज्ज करून ठेवल्या आहेत.
देवबाग किनारपट्टीस उधाणाचा धोका अद्यापही टळलेला नाही. अजस्र लाटांचा तडाखा किनारपट्टीस बसत आहे. तोंडवळी, तळाशिल, दांडी किनारपट्टी भागात लाटांच्या मार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील धामापूर, काळसे परिसरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मसुरे गावात जाणारे सर्व रस्ते पूरपरिस्थितीमुळे पाण्याखाली गेल्याने मसुरेचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पावसाचा जोर अद्यापही कायम असून जनजीवन विस्कळित झाले आहे.

4