दीपक केसरकर : कामचुकार करणाऱ्या पाटबंधारे अधिकाऱ्यांची चौकशी करणार
बांदा ता.०७: पूरपरिस्थितीत बाधित लोकांना तात्काळ मदत कार्य देणे शक्य व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस ठाण्यात एक बोट लाईफ जॅकेट व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली,येत्या पंधरा दिवसात यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
तिलारी धरणाचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे याप्रकरणी पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही,मात्र असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली आहे.असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.श्री केसरकर यांनी आज बांदा येथे जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली.त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी राजन पोकळे,अशोक दळवी,तहसीलदार राजाराम म्हात्रे,सुशांत पांगम आदी उपस्थित होते.
श्री.केसरकर पुढे म्हणाले,कालच्या परिस्थितीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून तेथील बोटी सुरक्षितेसाठी मागविण्यात आल्या होत्या.त्यांनी त्या उपलब्ध करून दिल्या त्यामुळे गोवा सरकारचे आपण आभार मानत आहोत.ज्या लोकांची नुकसानी झाली त्याचा पंचनामा करण्याचे आदेश आपण तहसीलदारांना दिले आहेत.यामुळे येणाऱ्या काळात सर्व नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.मातीची घरे असलेल्यांना वेगळे निकष लावण्यात येणार आहेत तशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असेही त्यांनी सांगितले.