कुडाळ-झाराप दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील खडी गेेली वाहून…

2

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या ३ ते ६ तास विलंबाने…

कणकवली, ता.७ : कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ ते झाराप या स्थानका दरम्यान अतिवृष्टीमुळे रेल्वे ट्रॅकखालील खडी वाहून गेल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरूस्ती करून रेल्वे मार्ग सुरळीत केला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. दरम्यान अतिवृष्टीचा फटका सर्वच रेल्वे गाड्यांना बसला असून तीन ते सहा तास विलंबाने पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. मंगला एक्स्प्रेस तर तब्बल ११ तास विलंबाने धावत आहे.
मडगाव-रत्नागिरी ही गाडी कुडाळ स्थानकावरून मार्गस्थ झाल्यानंतर एका ओढ्यालगतच रेल्वे ट्रॅकवरून पाणी वाहत असल्याने मडगाव-रत्नागिरी पॅसेंजरचे लोको पायलट एस.जी.गावडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर ही पॅसेंजर सावकाश झाराप स्थानकावर आणण्यात आली. तेथील स्टेशनमास्तरना याबाबतची कल्पना दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी रेल्वे पथक पाठविण्यात आले. यावेळी ट्रॅकखालील खडी वाहून गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर तातडीने येथील रेल्वे मार्गाची दुरुस्त करण्यात आली.
दरम्यान आज डाऊन मांडवी एक्स्प्रेस ४ तास, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ४ तास, डबलडेकर दीड तास, सीएसटीएम मंगलोर सहा तास, दुरांतो अडीच तास, राजधानी एक्स्प्रेस तीन तास, गोवा संपर्क क्रांती साडे तीन तास, मंगला एक्स्प्रेस ११ तास, गांधीधाम साडे तीन तास, नेत्रावती पाच तास, भावनगर कोचिवल्ली चार तास, जामनगर एक्स्प्रेस सहा तास, तेजस एक्स्प्रेस दोन तास आणि सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडी ६ तास विलंबाने धावत होती. तर मडगावहून मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस आज १ तास ४५ मिनिटे उशिरा सुटणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज सर्वच गाड्या विलंबाने धावत असल्याने कणकवली स्थानकात नेत्रावती एक्स्प्रेस १६३४६ गाडीला विशेष थांबा देऊन जनरल तिकीट असलेल्या कणकवली स्टेशनवरील प्रवाशांची सोय करण्यात आली.

4