पावसाचा जोर थांबता थांबेना : जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश
सिंधुदुर्गनगरी,ता. ७ : गेले तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टिच्या पार्श्वभूमीवर पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६० व्यक्तींना आणि ५१ जनावरांना शासकीय यंत्रणेने सुरक्षित स्थळी हलविले आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणी नदीमध्ये सोडण्यात आल्याने दोडामार्ग तालुक्यात सद्या पुरस्थिती आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे पुर्ण लक्ष केंद्रित केले असून एनडीआरएफचे पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येत्या चोवीस तासात अतिवृष्टि होणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने वर्तविला असल्याने सर्व यंत्राणांनी सतर्क राहावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
गेले तिन दिवस जिल्ह्यात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पुर आला होता. अनेक रस्ते, कोजवे, पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरात, शेतात घुसले होते. एकंदरित जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी घरात शिरल्याने दोडामार्ग तालुक्यातील घोडगेवाडी येथील १४ व्यक्ती, मणेरी ६ व्यक्ती, कुड़ासेवाणोंसेवाडी ५ व्यक्ती, आवाडे पालपोइ ४ व्यक्ती (यात एक गरोदर महिला), वेंगुर्ला तालुक्यातील सागरेश्वर ९ व्यक्ती, कुडाळ तालुक्यातील चेंदवण २५ व्यक्ती, सरंबळ ४८ व्यक्ती, कणकवली तालुक्यातील खारेपाटण ५ व्यक्ती, वैभववाडी तालुक्यातील डिगशी ३ व्यक्ती, मालवण तालुक्यातील मळा २० व्यक्ती व २५ जनावरे, बागवाडी ६ व्यक्ती व ८ जनावरे, देवली १२ व्यक्ती आणि १८ जनावरे अशा एकूण पुराच्या पाण्यात अडकलेल्या १६० व्यक्तींना आणि ५१ जनावरांना शासकीय यंत्रणेने सुरक्षित स्थळी हलविले आहे. हा शासकीय आकडा असला तरी ग्रामस्थांनी स्थानकी पातळीवर स्थलांतर केलेल्या व्यक्तींचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण पुर्ण भरले असून हे धरणे ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धारणातील पाणी नदीमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात सद्या पुरस्थिति आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने पुर्ण लक्ष केंद्रित केले असून एनडीआरएफचे पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येत्या चोवीस तासात अतिवृष्टि होणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने वर्तविला असल्याने सर्व यंत्राणांनी सतर्क राहावे असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
गतचोवीस तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२३.६५ च्या सरासरीने ९८९.२ मिमी पाऊस पडला आहे. तर आतापर्यंत २९२३.६८ च्या सरासरीने २३३८९.४ मिमी पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग- ९७ (३२०७), सावंतवाडी- २०९ (३००७), वेंगुर्ला- १२१.२ (३०९८.४), कुडाळ- १८० (२८१५), मालवण- ८५ (२४२९), कणकवली- १११ (३२०६), देवगड- ६६ (२३१३), वैभववाडी- १२० (३४१४) मिमी पाऊस पडला आहे.