काळसे बागवाडीत दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम… १२५ घरांना पुराच्या पाण्याचा वेढा ; ग्रामस्थांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर…

2

मालवण, ता. ७ : गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर सकाळच्या सत्रात काहीसा कमी झाला होता. मात्र तालुक्यातील आंबेरी मळा, काळसे बागवाडीमधील पूरस्थिती अद्याप कायम आहे. काळसे बागवाडीसह गावातील सुमारे १२५ घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून सुमारे ४५० ते ५०० लोक पुराच्या वेढ्यात अडकले आहेत.
यात गुरुनाथ पवार यांच्या घरात पाणी घुसले असून त्यांनी कुटुंबीयांसमवेत दोन दिवस सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर केले आहे. काळसे सरपंच केशव सावंत, माजी सभापती राजेंद्र परब यांच्यासह अनेकांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. बागवाडीत जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने स्थानिक ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंची ने आण करण्यासाठी होड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. २००९ नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पुर आल्याचे बागवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले.
काल सकाळी पाच वाजता खंडित झालेला वीज पुरवठा तीस तासानंतरही पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांचे हाल झाले. दैनंदिन व्यवहार, बँकांचे व्यवहारही पूर्णपणे ठप्प झाले होते.
दरम्यान तहसीलदार अजय पाटणे, आंबेरी मंडळ अधिकारी अनिल पवार, काळसे ग्रामसेवक पी. आर. निकम, तलाठी, जी. आर. परब, यांच्यासह इतर ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी काळसे सातेरी मंदिर येथे दाखल झाले असून ते पुरस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी काळसे येथे जात पुरस्थितीची पाहणी केली.
सातेरी मंदिर येथे दाखल झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी अल्पोपहार, भोजनाची दोन दिवस विनामोबदला सोय सौ. दीपिका देवेंद्र म्हापणकर यांनी केली आहे. शिवसेना पेंडूर विभागप्रमुख अण्णा गुराम यांनीही बिस्किटे, लाडू आदी साहित्य उपलब्ध करून दिले आहे.

13

4